धक्कादायक! कोरोना पॉझिटिव्ह मुलाला आईनं कारच्या डिक्कीत बंद केलं; अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 02:30 PM2022-01-13T14:30:41+5:302022-01-13T14:31:03+5:30
मुलाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येताच आईनं त्याला कारच्या डिक्कीत बंद केलं
वॉशिंग्टन: आईच्या प्रेमाची तुलना जगात कोणत्याच नात्याशी होऊ शकत नाही. आईचं प्रेम निस्वार्थ असतं. म्हणूनच तर स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असं म्हणतात. मात्र अमेरिकेच्या टेक्सासमधील आईनं कोरोनाची लागण झालेल्या तिच्या मुलाचा जीव धोक्यात घातला आहे. स्वत:ला कोरोनाची लागण होऊ नये म्हणून आईनं तिच्या पोटच्या गोळ्याला कारच्या डिक्कीत बंद केलं.
द गार्डियननं दिलेल्या वृत्तानुसार, ४१ वर्षीय आरोपी महिलेचं नाव सारा बीम आहे. सारा ३ जानेवारीला हॅरिस काऊंटीमध्ये ड्राईव्ह थ्रू चाचणी केंद्रावर पोहोचली. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं साराच्या डिक्कीतून येणारा आवाज ऐकला. त्यानं याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल होण्यापूर्वी सारानं डिक्की उघडून स्वत:च्या मुलाला बाहेर काढलं.
मुलगा कोरोना पॉझिटिव्ह असल्यानं त्याला कारच्या डिक्कीत बंद करून ठेवल्याचं सारा बीमनं पोलिसांना सांगितलं. मुलाच्या माध्यमातून आपल्याला कोरोनाची लागण होऊ नये यासाठी सारानं त्याला डिक्कीत बंद केलं. चौकशीनंतर साराला पोलिसांनी अटक केली. दुसऱ्याच दिवशी साराला जामीन मंजूर झाला. अमेरिकेतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून त्यातील लहान मुलांचं प्रमाण लक्षणीय आहे.