ठाणे: चारित्र्याच्या संशयातून कांदीवलीतील शेजाऱ्याचा खून करणा-यास हैद्राबाद येथून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 09:28 PM2018-03-26T21:28:59+5:302018-03-26T21:28:59+5:30
काशीमीरा खाडी परिसरात १२ मार्च रोजी सापडलेल्या एका अनोळखीच्या खूनाचा छडा लावण्यात ठाणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून शेजा-याचा कन्हैया गुप्ताने खून केल्याचे उघड झाले.
ठाणे : पत्नीचे रमेश चनारा (३०, रा. कुरार, कांदिवली, मुंबई) या पूर्वाश्रमीच्या शेजा-याशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून त्याचा खून करणा-या कन्हैय्या गुप्ता (३०, रा. क्रांतीनगर, कांदिवली) याला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. कोणताही धागादोरा नसताना आधी आकस्मिक मृत्यूची नोंद झालेल्या या गुन्ह्याचा पोलिसांनी कौशल्याने तपास करून यातील आरोपीला हैदराबाद येथून अटक केली.
भार्इंदरच्या सृष्टी खाडी परिसरात १२ मार्च २०१८ रोजी दुपारी काशिमीरा पोलिसांना एक अनोळखी मृतदेह मिळाला होता. त्याच्या खिशातील आधारकार्डच्या साहाय्याने त्याची ओळख पटवण्यात आली. रमेश चनारा हा कांदिवलीतून ९ मार्च रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार १० मार्च रोजी कुरार व्हिलेज पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, उपनिरीक्षक अभिजित टेलर आणि हवालदार विजय ढमरे आदींच्या पथकाने पुढे केलेल्या सखोल चौकशीमध्ये रमेश हा प्रभू गुप्ता याला शेवटचा भेटल्याचे तपासात उघड झाले. प्रभूच्याच चौकशीमध्ये त्याचा भाऊ कन्हैय्या गुप्ता हा सीसीटीव्हीचे काम करत असून तो ओमन देशात गेल्या एक वर्षापासून नोकरीला आहे. दीड वर्षापूर्वी कांदिवलीतील एका चाळीतील खालच्या खोलीत कन्हैय्या, पत्नी, त्याचा भाऊ आणि आईसह वास्तव्याला होता. तर, वरच्या खोलीत रमेश राहायला होता. जवळच खोल्या असल्यामुळे आपण कामानिमित्त बाहेर असताना पत्नी आणि रमेश यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता. याच संशयातून त्याने पत्नीला बिहारमध्ये गोपालगंज येथील माहेरी पाठवले. तर, तो पुन्हा ओमन देशात नोकरीला निघून गेला. परदेशी गेला असला तरी पत्नीच्या अनैतिक संबंधाची सल त्याच्या मनात सारखी सलत होती. यातूनच त्याने रमेशचा काटा काढायचे ठरवले. ९ मार्च रोजी परदेशातून तो मुंबईत आला. आल्यानंतर त्याने भाऊ प्रभू याच्याशी संपर्क साधून रमेशला कांदिवलीतील अप्पापाडा येथे रात्री ११ वा.च्या सुमारास घेऊन येण्यास सांगितले. तिथे आधीच वाट पाहत असलेल्या कन्हैय्याने रिक्षातून त्याला काशिमीरा खाडी परिसरात नेले. तिथेच रात्री १२ वाजताच्या सुमारास त्याच्या डोक्यात हेल्मेट टाकून आणि गळा आवळून खून केला. या खुनानंतर पसार झालेल्या कन्हैय्याला उपनिरीक्षक टेलर, हवालदार विजय ढमरे, पोलीस नाईक संजय शिंदे आणि पुष्पेंद्र थापा यांच्या पथकाने हैदराबादच्या काटीनार परिसरातून २२ मार्च रोजी अटक केली. त्याने खुनाची कबुली दिल्यानंतर याप्रकरणी आता पोलिसांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला २८ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने २३ मार्च रोजी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.