Thane Crime | ठाण्यातील मॉल परिसरात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेस अटक
By जितेंद्र कालेकर | Published: December 29, 2022 09:52 PM2022-12-29T21:52:09+5:302022-12-29T21:55:36+5:30
ठाणे गुन्हे शाखेची कारवाई, मालिकांमधील दोन अभिनेत्रींची सुटका
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: येथील घोडबंदर रोडवरील एका मॉलजवळील एका हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेस ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाच्या पथकाने गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अटक केली. तिच्या तावडीतून हिंदी मालिका तसेच वेबसिरीजमध्ये भूमीका निभावणाऱ्या दोन कलाकार तरुणींचीही पोलिसांनी सुटका केली आहे.
ठाण्यातील घोडबंदर रोडवरील सिने वंडर मॉल तळ मजला, डॉमिनोज रेस्टॉरंट येथे एक महिला काही तरुणींना शरीर विक्रयासाठी आणणार असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. त्याच आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या पथकाने २९ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास बनावट गिऱ्हाईक पाठवून सापळा लावला. या प्रकाराची खात्री झाल्यानंतर तिच्या तावडीतून मराठी, हिंदी वेब सिरीज, मालिका तसेच अल्बममध्ये सह कलाकार म्हणून काम करणाऱ्या दोन तरुणींची तिच्या तावडीतून सुटका केली आहे. या दलाल महिलेविरुद्ध चितळसर पोलिस ठाण्यात पिटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन मुलींना मानपाडा, ठाणे येथील सुरक्षागृहात ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.