ठाणे: पोटच्या मुलीला धमकावून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या पित्याला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2022 07:00 PM2022-08-06T19:00:04+5:302022-08-06T19:00:37+5:30
ठाणे पोस्को न्यायालयाचा निकाल
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: आपल्याच पोटच्या अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या ३५ वर्षीय पित्याला ठाणे अतिरिक्त सत्र व विशेष पोस्को न्यायालयाच्या न्यायाधीश व्ही व्ही वीरकर यांनी शनिवारी दोषी ठरवले. तसेच त्या नराधम पित्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकारी वकील म्हणून रेखा हिवराळे यांनी काम पाहिले. तर हा प्रकार २०१७ मध्ये भिवंडीत घडला होता.
पीडित मुलगीही १६ वर्षीय असून तिचे वडील तिला मारहाण करण्याचे धमकी देत, तिच्यावर घरातील सर्व जण झोपी गेल्यावर अत्याचार करत होते. तर ती घरात काम करत नाही म्हणून तिची आई तिला मारहाण करत होती. याला कंटाळून ती घरातून पळून गेली. याचदरम्यान एकदा रात्रीच्या वेळेस ती एका घराजवळ गेली असताना, त्या घरातील महिलेने तिला घरात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी तिने वडील अत्याचार करत असल्याने आपण घरातून पळून आल्याचे सांगितले. त्यानुसार त्या महिलेच्या मदतीने पीडित मुलीने भिवंडी शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यावर नराधम पित्याला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यावर पोलिसांनी ठाणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला न्यायाधीश व्ही व्ही वीरकर यांच्या न्यायालयाच्या समोर आल्यावर सरकार वकील रेखा हिवराळे यांनी आठ साक्षीदारांच्या साक्षीसह सादर केलेले पुरावे ग्राहय मानून आरोपी पित्याला जन्मठेपेसह दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा न्यायालयाने ठोठावली. दंडाची रक्कम न भरल्यास १०० दिवसांची साध्या कैदेची शिक्षा भोगावी लागणार असे आदेश दिले आहेत.