अट्टल गुन्हेगार मुजाहिद्दीन शेखवर एमपीडीएखाली कारवाई; येरवडा जेलमध्ये रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2022 08:04 PM2022-08-02T20:04:30+5:302022-08-02T20:05:12+5:30
सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात जबरी चोरी, खंडणी उकळणे तसेच ठार मारण्याचा प्रयत्न करणे, असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेला अट्टल गुंड मुजाहिद्दीन शेख ऊर्फ मामा याच्यावर ठाण्याचे सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी एमपीडीएअंतर्गत कारवाई केली. त्याला एक वर्षासाठी पुण्याच्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी मंगळवारी दिली.
भिवंडी शहर पोलीस ठाण्यामध्ये शेख याच्याविरुद्ध खंडणी गोळा करण्यासह जबरी चोरी, ठार मारण्याचा प्रयत्न करणे, शिवीगाळ आणि दमदाटी करण्यासह चार गंभीर स्वरूपाचे गुन्हे गेल्या वर्षभरापासून दाखल आहेत. त्यामुळेच त्याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेच्या कारवाईचा प्रस्ताव पोलीस आयुक्त जयजित सिंह आणि सह पोलीस आयुक्त कराळे यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्याच्यावरील गुन्ह्यांची पडताळणी करून भिवंडीचे पोलीस उपायुक्त यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार त्याला ३० जुलै २०२२ रोजी पुण्याच्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्याची कारवाई ठाणे पोलिसांनी केली आहे.
आतापर्यंत १४ गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई
शहरात दहशत निर्माण करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंह यांनी अवलंबिले आहे. सराईत गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी २०२२ मध्ये जुलैअखेर १४ अट्टल गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई केली.