ठाणेदार चिडे हत्याप्रकरण :आरोपींना न्यायालयीन कोठडी तर दोघांना पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 08:10 PM2018-11-20T20:10:55+5:302018-11-20T20:11:52+5:30
६ नोव्हेंबर रोजी नागभीडचे प्रभारी ठाणेदार छत्रपती किसन चिडे यांची दारू तस्कारांनी नागभीड तालुक्यातील मौशी या गावाजवळ त्यांच्या अंगावर गाडी टाकून निर्घृण हत्या केली होती व मारेकरी गाडीसह पसार झाले होते.
चंद्रपूर - नागभीडचे प्रभारी ठाणेदार छत्रपती चिडे यांच्या हत्येप्रकरणात सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. मात्र, अन्य एका प्रकरणात यातील २ आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली.
६ नोव्हेंबर रोजी नागभीडचे प्रभारी ठाणेदार छत्रपती किसन चिडे यांची दारू तस्कारांनी नागभीड तालुक्यातील मौशी या गावाजवळ त्यांच्या अंगावर गाडी टाकून निर्घृण हत्या केली होती व मारेकरी गाडीसह पसार झाले होते.या घटनेने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती.चिडे यांच्यावरील अंत्यसंस्काराचे सोपस्कार पार पडल्यानंतर पोलिसांनी या हत्येशी संबंधित आरोपींचे अटकसत्र सुरू केले होते. या प्रकरणात एकूण १३ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांचेविरोधात भां.दं.वि.च्या कलम ३०२,३०७,३५३,३३३,१२० (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपींना २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने या आरोपींना आज नागभीड येथील न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता न्यायालयाने ठाणेदार चिडे प्रकरणात या १३ आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. तर अन्य एका प्रकरणात यातील दोन आरोपींना पोलीस कोठडी सुनावली.
तसेच आरोपींना आज नागभीड येथील न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याने आरोपींच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. त्याचबरोबर बघ्यांचीही झुंबड उडाली होती.