ठाण्यातील कॉल सेंटर प्रकरण : व्यवस्थापकाची होती २० टक्क्यांची भागीदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 06:04 AM2018-07-13T06:04:14+5:302018-07-13T06:04:33+5:30
अमेरिकन नागरिकांकडून खंडणी उकळणाऱ्या ठाण्यातील बोगस कॉल सेंटर प्रकरणात मंगळवारी आणखी एका व्यवस्थापकाला अटक झाली.
ठाणे : अमेरिकन नागरिकांकडून खंडणी उकळणाऱ्या ठाण्यातील बोगस कॉल सेंटर प्रकरणात मंगळवारी आणखी एका व्यवस्थापकाला अटक झाली. त्याची या कंपनीत २० टक्क्यांची भागीदारी होती. यातून आरोपींनी कशी माया जमवली, याची तपशीलवार माहिती त्याने पोलिसांना दिली आहे.
कर चुकवणाºया अमेरिकेतील नागरिकांशी संपर्क साधून त्यांच्याकडून खंडणी उकळणाºया ठाण्यातील बोगस कॉल सेंटर्सचा पर्दाफाश ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१ ने आॅक्टोबर २०१६ मध्ये केला होता. मंगळवारी याप्रकरणी तपेश गुप्ताला पोलिसांनी अटक केली. यातील सूत्रधार शॅगी, तपेश गुप्ता आणि अविनाश मास्टर हे वर्गमित्र होते. तपेशने एका बीपीओ कंपनीत नोकरी केली. त्यावेळी फेसबुकद्वारे शॅगी पुन्हा तपेशच्या संपर्कात आला. शॅगीने त्याच्या कॉल सेंटरमध्ये नोकरीचा प्रस्ताव मांडला. त्यावेळी या कॉल सेंटरमधे काय चालते याची माहिती नव्हती असे तपेशने सांगितले.
तपेशने तेथे नोकरी पत्करली, त्यावेळी आसनक्षमता केवळ २० होती. काही दिवसांतच शॅगीने कॉल सेंटरचा विस्तार करण्याची इच्छा व्यक्त केली. पाहतापाहता इमारतीमधील सात मजल्यांमध्ये बोगस कॉल सेंटरचा कारभार विस्तारला. आॅपरेटर्सची संख्या २० वरून २०० पर्यंत पोहोचली. तसेच नफ्यातही वाढ झाली. कॉल सेंटर चालवणाºया प्रमुख आरोपींमध्ये सहभाग असलेला तपेश गुप्ता शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत आहे.
संपत्तीचे प्रदर्शन शॅगीच्या अंगाशी
शॅगीला कॉल सेंटरमधून अल्पावधीत मोठी माया मिळाली. संपत्तीचे प्रदर्शन करणे त्याला आवडायचे. यातूनच त्याच्याबद्दल कुजबूज सुरू झाली आणि हा विषय पोलिसांपर्यंत पोहोचला, असे तपेश गुप्ताचे म्हणणे आहे.
अंगडियाने यायचा पैसा : अमेरिकन नागरिकांना आयट्यून अथवा अन्य गिफ्टकार्ड घेण्यास बाध्य करून कार्डवरील सांकेतिक क्रमांक आरोपी घ्यायचे. त्याआधारे गिफ्टकार्डची रक्कम आरोपी वठवायचे. याशिवाय, शॅगीची देशविदेशांतील बँकांमधील खात्यांची माहितीही पोलिसांना मिळाली होती. तपेशने या आर्थिक साखळीमधील वेगळी माहिती पोलिसांना दिली. गुन्ह्यातील रोकड बºयाचदा अंगडियाद्वारेही आली असल्याचे त्याने सांगितले.