ठाणे कारागृहात अनर्थ टळला, तुरुंगाधिकाऱ्यांच्या पोटात काच खुपसणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 21:14 IST2018-08-27T21:14:04+5:302018-08-27T21:14:48+5:30
अधिकाऱ्यांनी वेळीच भोंगा वाजवून धोक्याचा इशारा दिल्याने वरिष्ठांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असून कारागृहातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

ठाणे कारागृहात अनर्थ टळला, तुरुंगाधिकाऱ्यांच्या पोटात काच खुपसणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
ठाणे - कारागृहात इतर कैद्यांचा छळ केल्याबाबत विचारणा केली असता संतप्त दोन कैद्यांनी तुरुंगाधिकाऱ्यांच्या पोटात खिडकीची काच फोडून खुपसण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांनी वेळीच भोंगा वाजवून धोक्याचा इशारा दिल्याने वरिष्ठांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असून कारागृहातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बराक क्रमांक ३ मध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या आशीष नायर आणि छोटेलाल दुलारे सहानी हे कैदी शिक्षा भोगत आहेत. १८ ऑगस्ट रोजी दिंडोशी न्यायालयात हे दोघे सुनावणीसाठी गेले असता नायरने सहानी याला नशेच्या कॅप्सूल गिळायला लावल्या होत्या. कारागृहात परतल्यानंतर सहानीच्या पोटातील त्या कॅप्सूल बाहेर काढण्यासाठी नायर त्याला सतत मिठाचे आणि तंबाखूचे पाणी पाजवून उलटी करण्यास सांगत होता, मात्र उलटी करूनही त्या कॅप्सूल बाहेर न पडल्याने सहानीची प्रकृती ढासळली. याप्रकरणी सहानीने कारागृहातील वॉर्डन इरफान पठाण यांच्यासह कारागृहाच्या तुरुंग अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीबाबत चौकशी करण्यासाठी तुरुंग अधिकारी सतीश माने, वरिष्ठ तुरुंग अधिकारी कानसकर, शिंदे यांनी नायर याला कारागृहातील कार्यालयात बोलावले. यावेळी संतप्त नायर याने या अधिकाऱ्यांकर हल्ला केला. तसेच अभिनव सिंग नावाच्या कैद्याने देखील अधिकाऱ्यावर हल्ला करण्यास नायरला मदत केली. याप्रकरणी नायर आणि सिंगविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.