‘त्या’ तरुणाच्या खून प्रकरणातील आरोपीस हैदराबाद येथून उचलले

By राजकुमार जोंधळे | Published: January 12, 2024 08:38 PM2024-01-12T20:38:43+5:302024-01-12T20:39:26+5:30

गुन्ह्यातील आरोपींच्या शोधासाठी विविध पथके तैनात केली होती. त्याचा खून नेमका कोणी आणि कशासाठी केला? याबाबत प्रारंभी संभ्रम होता.

The accused in the murder case of 'that' youth was picked up from Hyderabad | ‘त्या’ तरुणाच्या खून प्रकरणातील आरोपीस हैदराबाद येथून उचलले

‘त्या’ तरुणाच्या खून प्रकरणातील आरोपीस हैदराबाद येथून उचलले

लातूर : शहरात एका तरुणाचा वारंवार पैसे मागत असल्याच्या कारणावरून खून करणाऱ्या आरोपीला हैदराबादमधून उचलण्यात आले असून, ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा आणि विवेकानंद चौक पोलिस ठाण्याच्या पथकाने संयुक्तपणे केली आहे.

पोलिसांनी सांगितले, लातुरातील ताजाेद्दिन बाबानगर परिसरात ६ जानेवारी रोजी रात्री झोपलेल्या फारुख ऊर्फ मुकड्या सुजातली सय्यद याचा तीक्ष्ण शस्त्राने डोक्यात, गळ्यावर, हातावर वार करून खून केल्याची घटना घडली. याबाबत विवेकानंद चौक ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. खून करण्यात आलेला तरुण सराईत, पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. दरम्यान, गुन्ह्यातील आरोपींच्या शोधासाठी विविध पथके तैनात केली होती. त्याचा खून नेमका कोणी आणि कशासाठी केला? याबाबत प्रारंभी संभ्रम होता. शिवाय, स्थानिक नागरिकांकडून याबाबत फारशी माहिती मिळत नव्हती. 

जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, डीवायएसपी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पो. नि. संजीवन मिरकले, विवेकानंद चौक ठाण्याचे पो. नि. सुधाकर बावकर यांच्या पथकांनी आरोपीचा शोध सुरू केला. पथकाकडून रेकॉर्डवरील अनेक गुन्हेगारांना ताब्यात घेत झाडाझडती घेण्यात आली. खबऱ्याने दिलेली माहिती, सायबर सेलने केलेल्या तपासातून संशयित आरोपीने हैदराबादमध्ये दडी मारल्याचे समाेर आले. पोउपनि. अनिल कांबळे, रियाज सौदागर, योगेश गायकवाड, आनंद हल्लाळे यांच्या पथकाने हैदराबाद गाठले. हैदराबादमधील बोराबंडा परिसरात सापळा लावून माेठ्या शिताफीने त्याला अटक केली. समीर ऊर्फ जालिम अखिल शेख (वय २४, रा. साळेगल्ली, लातूर) असे अटकेतील संशयिताने आपले नाव सांगितले.

वारंवार पैशाची मागणी; त्रस्त आराेपीकडून काटा...

मुकड्या सतत खर्चासाठी पैशाची मागणी करीत होता. समीरने मृत तरुणाला अनेकदा पैसेही दिले. मात्र, ताे समीरकडे रोजच पैशाची मागणी करू लागला. पैसे नाही दिल्यास समीरला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देत होता. या प्रकाराला कंटाळलेल्या समीरने फारूक ऊर्फ मुकड्याच्या डोक्यात फरशी घालून, गळ्यावर चाकूने वार करून खून केल्याचे पाेलिसांनी सांगितले.


 

Web Title: The accused in the murder case of 'that' youth was picked up from Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.