पंधरा वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणारा दरोड्यातील आरोपी अखेर जेरबंद!
By Appasaheb.patil | Published: July 17, 2023 02:51 PM2023-07-17T14:51:14+5:302023-07-17T14:51:29+5:30
मंगळवेढा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय माहितीदाराकडून पाहिजे असलेला आरोपी बोराळे गावाकडे जाणार असल्याची माहिती मिळाली हाेती.
सोलापूर : एका खुनासह फसवणूक, दरोड्यातील पाहिजे असलेला आरोपी १५ वर्षापासून राज्यातील विविध शहरात वेशांतर करून राहत होता. मंगळवेढा तालुक्यातील बोरोळे हद्दीत आल्यानंतर त्यास पकडण्यात सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे.
मंगळवेढा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय माहितीदाराकडून पाहिजे असलेला आरोपी बोराळे गावाकडे जाणार असल्याची माहिती मिळाली हाेती. माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे व त्यांच्या पथकाने सिध्दापूर ते बोराळे जाणा-या रस्त्यावर सापळा रचला.
गोपनीय मिळालेल्या माहितीनुसार एक जण बोराळे हद्दीत आल्यानंतर त्यास ताब्यात घेतले. अधिकची कसून चौकशी केली असता त्याने केलेले गुन्हे कबूल केले. शिवाय अभिलेख पडताळणी तपासणी केली असता पाहिजे आरोपी यादीतील हा आरोपी असल्याचे समोर आले. संबंधित आरोपीवर मंगळवेढ्यात तीन तर मंद्रुप येथे एक गुन्हा दाखल आहे. पुढील कारवाईसाठी आरोपीस मंगळवेढा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेत्तृत्वाखाली पोलीस उप-निरीक्षक सुबोध जमदाडे, सहा.फौज घोळवे, पोहवा/परशुराम शिंदे, मपोना पल्लवी इंगळे, पोकॉ अजय वाघमारे, अन्वर अत्तार, यश देवकते, सुरज रामगुडे, मपोकॉ झळके, चापोहवा प्रमोद माने, यांनी केली आहे.