रत्नागिरीतील तिहेरी हत्याकांडातील आरोपीबाबतचे धागेदोरे पोलिसांच्या हाती, लवकरच अटक होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 10:30 PM2022-01-21T22:30:40+5:302022-01-21T22:31:04+5:30
Crime News: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील नातू खोतवाडी येथे तीन वृद्ध महिलांची एकाच वेळी हत्या झाल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, या तिहेरी हत्याकांडातील आरोपीबाबतचा महत्त्वपूर्ण पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे.
रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील नातू खोतवाडी येथे तीन वृद्ध महिलांची एकाच वेळी हत्या झाल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, या तिहेरी हत्याकांडातील आरोपीबाबतचा महत्त्वपूर्ण पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. आरोपीने चोरलेली पेटी विहिरीत सापडली असून, लवकरच पोलीस खुन्याला जेरबंद करतील असा अंदाज व्यक्त होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली वणौशी तर्फे नातू खोतवाडी येथे तीन वृद्ध महिलांची एकाच वेळी हत्या झाली होती. तिहेरी हत्याकांडामध्ये
सत्यवती पाटणे-75, पार्वती पाटणे- 90 व इंदुबाई पाटणे 85 या तीन महिलांचा मुत्यू झाला होता. खून नेमका कशामुळे झाला याचा पोलिसांनी कसून तपास केला असता घरातील दागिने गायब असल्याचे तपासादरम्यान आढळून आले, त्यामुळे चोरीच्या उद्देशाने खून झाला असावा असा संशय पोलिसांना आला होता. त्यावरून तपासाची चक्रे फिरवली गेली असता पोलिसांच्या हाती काही धागेदोरे सापडले असून खोतवाडी च्या शेजारीच असणाऱ्या विहिरीमध्ये सत्यवती पाटणे यांची पेटी आढळून आली आहे. त्यामुळे संशयित आरोपीने या पेटीतील मुद्देमाल काढून घेऊन ही पेटी विहिरीत फेकली असण्याचा संशय पोलिसांना आला असून, या विहिरीत नेमकं अजून काय आहे. याचा तपास पोलिस करीत आहेत.
तसेच जवळच असणार्या जंगलात अजून काही पुरावे हाती लागतात का याचा पोलीस गेले चार दिवस तपास करीत आहेत. १४ जानेवारी पासून या ठिकाणी डीवायएसपी शशी किरण काशीद, जयश्री देसाई अप्पर पोलीस अधीक्षक, दापोली पोलिस निरीक्षक नितीन ढेरे, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग, ठाण मांडून आहेत.
तिहेरी हत्याकांडचा हत्यारा पोलिसांच्या हाती लागत नव्हता. डॉग स्कॉडच्या मदतीने गुन्हेगाराचा शोध सुरू होता. मात्र गुन्हेगाराने कोणताही पुरावा सोडला नसल्याने पोलिसांना तपासात अडचणी येत आहेत. परंतु त्या विहिरीत पाण्यावर औषध गोळ्याचे काही पॉकेट तरंगताना पोलिसांच्या निदर्शनास पडले. त्यावरून औषध गोळ्या ची पाकिटे बाहेर काढून पाहिले असता अलिकडची तारीख असलेल्या या गोळ्याचे पाकीट कोणी टाकले असावे यावरून संशय आला असता पाण्यात एक पेटी पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामुळे आरोपीने यातील मुद्देमाल काढून घेऊन ही पेटी विहिरी मध्ये टाकली असावी या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.
सत्यवती पाटणे या सावकारी पैसे देत असल्याचे स्थानिकाकडून चर्चिले जात असून, या पैशाच्या देवाणघेवाणीतून खून झाला की काय अशी चर्चा सुद्धा पंचक्रोशीत सुरू आहे. तसेच ती पेटी गायब झाल्याने व त्या तीनही वृद्ध महिलांच्या अंगावरील दागिने गायब असल्याने खून हा चोरीसाठीच झाला असावा असाच संशय पोलिसांनी यापूर्वीच व्यक्त केला होता. परंतु आता पोलिसांच्या हाती सबळ पुरावा लागल्याने फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट नंतर संशयित त्यानेच हा गुन्हा केलाय का हे सिद्ध होणार आहे. परंतु सध्या तरी पोलीस सबळ पूराव्यापर्यंत पोहोचल्याने तिहेरी हत्याकांडातील तो नराधम पोलिसांच्या तावडीत सापडण्याची शक्यता आहे.