१४ कोटींच्या दरोड्याचा मास्टरमाईंड; बॉलिवूड सिनेमालाही भारी पडेल, ‘अशी’ रचली कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 02:55 PM2022-01-24T14:55:12+5:302022-01-24T14:55:46+5:30
या दरोड्याचा मास्टरमाईंड रवी पेशेंट नाव होतं. त्याचे सहकारी त्याला मास्टरजी नावानं ओळखतात.
पटना - चोरी, दरोडा आणि लूटमार अशा बातम्या तुम्ही नेहमी ऐकत आला असाल. या गुन्ह्यातील आरोपींना पकडल्याच्या बातम्याही माध्यमात वाचायला मिळतात. परंतु पटना येथे दिवसाढवळ्या एका दरोड्याचा प्रकार समोर आला आहे. यातील मास्टरमाईंडची तयारी पाहून तुम्हीही म्हणाल, हा दरोडा आहे की, एखाद्या बॉलिवूड सिनेमालाही भारी पडेल अशी कहानी रचली आहे.
शुक्रवारी बिहारच्या राजधानी पटना येथे बाकरगंज परिसरात एका सराफ व्यवसायाच्या दुकानावर टोळक्यांनी दरोडा टाकला. यात तब्बल १४.१४ कोटी रुपये लुटण्यात आले. या दरोड्यातील सहभागी आरोपी पटना आणि जहानाबाद येथील आहेत. या दरोड्यावेळी आसपासच्या दुकानादारांनी ध्येर्याने गुन्हेगारांचा सामना करत त्यांच्या पकडण्यात यश आलं. साधू नावाच्या आरोपीनं पोलिसांसमोर त्याच्या ३ साथीदारांची नावं आणि पत्ते सांगितले. साधूच्या चौकशीनंतर पोलिसांनी ३६ तासांत ११ ठिकाणी छापेमारी केली. साधूनं दरोड्याच्या मास्टरमाईंडबाबत खुलासा केला.
या दरोड्याचा मास्टरमाईंड रवी पेशेंट नाव होतं. त्याचे सहकारी त्याला मास्टरजी नावानं ओळखतात. रवी याआधी पोलिसांच्या हाती सापडला होता परंतु पटना कोर्टात हजर करताना तेथून तो पसार झाला. मात्र आता रवीची ओळख पटवणं पोलिसांसाठी अवघड झालं आहे. रवीचा फोटो असूनही त्याला शोधणं आव्हानात्मक झालं आहे. त्याचं कारण असं की, रवीनं दरोडा आणि पोलिसांपासून वाचण्यासाठी स्वत:चा चेहरा बदलला. रवी पेशेंटच्या ज्या चेहऱ्याचा पोलीस शोध घेतायेत तो आता बेपत्ता आहे.
रवीच्या नव्या चेहऱ्याची ओळख सध्या कुणाकडेही नाही. साधूनं त्याच्या जबाबात रवी नावाच्या दोन गुन्हेगारांवर संशय व्यक्त केला. त्यातील एकाच्या गुन्ह्याचं स्वरुप ताज्या दरोड्याच्या गुन्ह्यासारखंच आहे. त्याच आधारे पोलिसांना रवी पेशेंटवर दाट संशय आला आहे. जो पोलिसांच्या तावडीतून पसार झाला होता. रवीच्या शोधात पोलीस एका मुलीपर्यंत पोहचली. ही मुलगी रवीची प्रेयसी होती. परंतु रवी हाताला लागला नाही. मास्टरजी नावानं कुप्रसिद्ध असलेला रवीनं पसार झाल्यानंतर स्वत:चा चेहरा आणि हेअरस्टाईल बदल त्याची जुनी ओळख मिटवून टाकली.
रवीचा चेहरा इतका बदलला आहे की, त्याची सहकारी आरोपी साधूने त्याचा जुना फोटो पाहूनही ओळखू शकला नाही. साधूने रवीचा जुना फोटो आणि आत्ताचा रवी यात फरक असल्याचं सांगितले. त्यामुळे रवीनं चेहरा बदलण्यासाठी सर्जरीचा आधार घेतला असावा असं पोलिसांना वाटतं. रवीनं त्याच्या नाकाची सर्जरी केली आहे. त्याशिवाय हेअरस्टाईल बदलून विगचा सहारा घेतला आहे. तर डोळ्यांवर मोठ्या काचेचा चष्मा घालतो. साधूकडेही रविचा फोटो नाही. दरोड्यात सहभागी सगळ्यांनी मास्क घातल्याचं सांगितले. आता रवीचं स्केच बनवण्यात आले आहे. हे स्केच रवीच्या चेहऱ्याशी ६० टक्के जुळतं असं साधूनं सांगितले आहे.