चिमुकलीवर अत्याचार करुन खून करणाऱ्यास फाशी; कऱ्हाड न्यायालयाचा निकाल
By संजय पाटील | Published: July 21, 2023 03:10 PM2023-07-21T15:10:34+5:302023-07-21T15:11:23+5:30
पीडितेच्या कुटुंबाला दीड वर्षात न्याय
कऱ्हाड: आठ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तीचा खून केल्याप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. कºहाडच्या विशेष अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. के. एस. होरे यांनी शुक्रवारी ही शिक्षा ठोठावली.
संतोष चंद्रू थोरात (वय ४१, रा. रूवले, ता. पाटण) असे फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सरकार पक्षाचे वकील अॅड. राजेंद्र सी. शहा यांनी केलेला युक्तिवाद आणि ढेबेवाडी पोलिसांनी पुराव्यासह सादर केलेले दोषारोपपत्र ग्राह्य मानून न्यायालयाने हा निकाल दिला. पश्चिम महाराष्ट्रात गत चाळीस वर्षात प्रथमच न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
सरकारी वकीलांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष थोरात हा २९ डिसेंबर २०२१ रोजी एका अल्पवयीन मुलीला व तिच्या मैत्रिणीला शेतात घेऊन गेला होता. शेतातून परत आल्यावर त्या दोन्ही मुली आरोपी थोरात याच्या घराबाहेर खेळत होत्या. काही वेळानंतर पीडित मुलीची मैत्रिण घरी निघून गेली. पीडित आठ वर्षीय मुलगी एकटी असल्याची संधी साधून आरोपीने तिला चॉकलेटचे आमिष दाखवत रुवले गावातील निर्जनस्थळी नेले. तिच्यावर तिथे अत्याचार करत तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह दरीत फेकून दिला. हा प्रकार समोर आल्यावर पोलिसांनी तपास करत आरोपीला अटक केली. ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी या गुन्ह्याचा तपास करत दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी वकील अॅड. राजेंद्र शहा यांनी युक्तिवाद केला.
पश्चिम महाराष्ट्रात गत अनेक वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा लागल्याने जनतेचा बाललैंगिक अत्याचार कायदा आणि न्यायालयावरचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे मत सरकारी वकील राजेंद्र सी. शहा यांनी यावेळी सांगीतले.