२८ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला बेड्या, पोलिस बनले बेस्टचे कर्मचारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 08:13 AM2023-03-23T08:13:41+5:302023-03-23T08:14:11+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. दा. भ. मार्ग पोलिस ठाणे येथे १९९५ मध्ये राजीव खंडेलवाल (६७) यांना विविध कंपन्यांचे २० लाख रुपयांचे बोगस शेअर्स देऊन आरोपी वीरेंद्र संघवी ऊर्फ महेश शहा याने त्यांची फसवणूक केली.
मुंबई : बोगस शेअर्स देत २० लाख रुपयांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीला डॉ. दा. भ. मार्ग पोलिसांनी बेस्टचे कर्मचारी बनून बेड्या ठोकल्या आहेत. वीरेंद्र संघवी ऊर्फ महेश शहा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे तब्बल २८ वर्षांनी तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. दा. भ. मार्ग पोलिस ठाणे येथे १९९५ मध्ये राजीव खंडेलवाल (६७) यांना विविध कंपन्यांचे २० लाख रुपयांचे बोगस शेअर्स देऊन आरोपी वीरेंद्र संघवी ऊर्फ महेश शहा याने त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हा नोंदवत पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्यानंतर, तो जामिनावर बाहेर आला. १९९६ पासून शहाला न्यायालयाने फरार घोषित केले. तेव्हापासून पोलिस त्याचा शोध घेत होते.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप खुडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सणस, रोकडे, नितीन झाडे, कांगणे आणि अंमलदार यांनी ४० ते ५० लोकांकडे शहाविषयी चौकशीही केली. तेव्हा दाणाबंदर परिसरात त्याच्या मालकीची खोली असल्याचा सुगावा लागला. मात्र, तेथे पोलिसांना त्याचे वीजबिल सापडले. पुढे त्याचाच आधार घेत पोलिसांनी बेस्टचे कर्मचारी बनून खोलीच्या वीजबिलाची पडताळणी करण्याचे कारण पुढे करीत शहाशी संपर्क साधला. वीजपुरवठा खंडित करण्याची भीती घालताच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.