बिहारमध्ये सातारी भाषा बोलला, पोलिसांनी क्षणात पकडला; ५ महिन्यांनी गुन्हा उघडकीस
By दत्ता यादव | Published: April 11, 2024 08:41 PM2024-04-11T20:41:46+5:302024-04-11T20:42:04+5:30
गेल्या पाच महिन्यांपासून पोलिसांचे पथक त्याची साताऱ्यातून नेहमी माहिती काढत होते. बिहार येथील गया या गावात संशयित नरेंद्र चाैधरी हा आला असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली.
सातारा : पाच महिन्यांपूर्वी गोडोलीतील एका तरुणाचा खून करून पसार झालेल्या आरोपीला बिहारमधून पोलिसांनी अटक केली. ही कारवाई सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने केली. चाैकशी करत असताना आरोपी सातारी भाषा बोलला. त्यामुळे क्षणात त्याच्यावर संशय आल्याने तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. नरेंद्र ऊर्फ छोटू रामदिन चाैधरी-पटेल (वय ;२३, रा. पैडी खुर्द, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश), असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बालाजी सोमनाथ रेड्डी(वय २७, रा. करंजे-म्हसवे रोड, सातारा) याचा गोडाेली येथे ३० ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री अज्ञाताने खून केला होता. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणचे पथक या खून प्रकरणाचा तपास करत असताना हा खून एका परप्रांतीय तरुणाने केला असून, तो सातारा शहरामध्ये आठ वर्षांपासून राहत होता, अशी माहिती मिळाली. परंतु खून करून तो उत्तर प्रदेश येथे गेला असल्याचे समोर आले.
गेल्या पाच महिन्यांपासून पोलिसांचे पथक त्याची साताऱ्यातून नेहमी माहिती काढत होते. बिहार येथील गया या गावात संशयित नरेंद्र चाैधरी हा आला असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर डीबी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक अविनाश माने, पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे, हवालदार सुजित भोसले, नीलेश जाधव, पंकज माेहिते, विक्रम माने यांचे पथक बिहारला गेले. या पथकाने सलग दोन दिवस गया शहरामध्ये शोध घेऊन आरोपीला पकडले.
पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक ऑंचल दलाल, उपविभागीय अधिकारी राजीव नवले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के, पोलिस निरीक्षक (गुन्हे) नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
असा अडकला 'तो' जाळ्यात...
पोलिसांच्या पथकाने बिहारच्या रहिवाशांना आरोपीचा फोटो दाखविला. परंतु त्याची ओळख पटत नव्हती. त्यातील एक युवक स्वत:ची ओळख लपविण्यासाठी खोटी माहिती देत असल्याचा पोलिसांना संशय आला. संबंधित तरुणाने मोठे केस व दाढी वाढविल्याने पोलिसांकडे असलेला फोटोतील चेहरा मिळता जुळता दिसत नव्हता. परंतु पोलिसांनी त्याच्यावर प्रश्नाचा भडिमार केला. पोलिसांचे पथक त्याच्याकडे हिंदी भाषेतून चाैकशी करत असताना त्याच्या बोलण्यातून नकळत सातारा जिल्ह्यातील भाषेचा वापर झाला. यामुळे पोलिसांना हाच आरोपी असल्याचा संशय आला. त्याच्याकडे कसून चाैकशी केल्यानंतर त्याने नरेंद्र चाैधरी, असे नाव सांगितले. त्यानंतर त्याने बालाजी रेड्डीचा खून पूर्वीच्या वादावादीतून केला असल्याची कबुलीही दिली. पोलिसांनी त्याला बिहारमधून साताऱ्यात आणले. न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.