जन्मदात्या आईनेच केली ११ महिन्यांच्या चिमुकल्याची हत्या
By जितेंद्र ढवळे | Published: October 13, 2022 12:17 AM2022-10-13T00:17:30+5:302022-10-13T00:18:10+5:30
पाण्याच्या टाकीत फेकले, टाकळघाटच्या शिक्षक काॅलनीतील घटना
बुटीबोरी (नागपूर): काैटुंबिक कलहातून जन्मदात्या आईनेच ११ महिन्यांच्या चिमुकल्यास पाण्याच्या टाकीत फेकून त्याची हत्या केली. ही घटना एमआयडीसी बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील टाकळघाट येथील शिक्षक काॅलनीत बुधवारी (दि. १२) दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. पाेलिसांनी घटनेच्या काही तासांतच हत्येचा छडा लावत आराेपी आईला अटक केली.
सारांश पंजाब पाठेकर (११ महिने) असे मृत बालकाचे नाव आहे. एकता पंजाब पाठेकर (२७) असे अटकेतील आराेपी आईचे नाव आहे. एकता आणि तिचा पती पंजाब हे नरखेडचे मूळ रहिवासी आहेत. त्यांनी प्रेमविवाह केला असून, कामाच्या शाेधात ते बुटीबाेरी एमआयडीसी येथे आले हाेते. ११ महिन्यांच्या सारांशसह पती-पत्नी टाकळघाट येथील शिक्षक काॅलनीत मनाेहर भेंडे यांच्या घरी भाड्याने वास्तव्यास हाेते. बुधवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास पंजाब कामावरून परत आला. दहा वाजता जेवण केल्यानंतर ताे झाेपला हाेता. यावेळी पलंगाजवळ पाळण्यात सारांशसुद्धा झाेपलेला हाेता, तर एकता भांडी धूत हाेती. तेव्हापर्यंत सारांश पाळण्यात हाेता. मात्र, ती कपडे धुऊन आल्यानंतर सारांश दिसून न आल्याने तिने पंजाबला झाेपेतून उठविले. दाेघांचा आरडाओरडा ऐकूण शेजारी गाेळा झाले. नागरिकांनी सर्वत्र सारांशचा शाेध घेतला. दरम्यान, घराच्या छतावर असलेल्या पाण्याच्या टाकीत पाहिले असता, तिथे सारांश बुडालेला आढळून आला.
लगेच त्याला प्राथमिक आराेग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर त्याला बुटीबाेरी येथील खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. तिथे तपासणीअंती डाॅक्टरांनी त्याला मृत घाेषित केले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी बुटीबाेरी पाेलीस घटनास्थळी पाेहाेचले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत उपविभागीय पाेलीस अधिकारी पूजा गायकवाड, ठाणेदार अशाेक काेळी यांनी घटनास्थळी पाहणी केली. घटनास्थळाच्या पाहणीदरम्यान, बाहेरील व्यक्ती येऊन घरातील बालकाला पाण्याच्या टाकीत फेकण्याची शक्यता कमी असल्याने पाेलिसांचा संशय बळावला. दुसरीकडे पती-पत्नीने कुणासाेबत भांडण असल्याबाबत नकार दर्शविल्याने पाेलिसांना दाम्पत्यावर शंका आली. त्यांची कसून विचारपूस केली असता, एकताने सारांशला पाण्याच्या टाकीत फेकल्याची कबुली दिली.
पतीच्या टाेमण्यांमुळे हाेती त्रस्त
एकताला मिर्गीचा आजार हाेता. त्यामुळे सारांशच्या जन्मानंतर तिने दूध पाजले नव्हते. यामुळे सारांश हा कमजाेर असल्याने पंजाब तिला दाेष देऊन सतत टाेमणे मारत हाेता. यावरून दाेघांमध्ये नेहमी वाद व्हायचा. या त्रासाला कंटाळून रागाच्या भरात एकताने आपल्या पाेटच्या मुलाला टाकीत फेकले. त्यात निरागस सारांशचा दुर्दैवी मृत्यू झाला.