तीन वर्षांच्या मुलाचा जमिनीत पुरलेला मृतदेह काढला बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2022 08:49 AM2022-08-01T08:49:07+5:302022-08-01T08:49:14+5:30
विरारमधील घटना : हत्येचा पोलिसांचा संशय
लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : विरार पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी तीन वर्षांच्या आदिवासी मुलाचा जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढला आहे. काही दिवसांपूर्वी त्या मृत मुलाच्या सावत्र पित्याने त्याला जमिनीत पुरले होते. त्याची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. पंचनाम्यासाठी तेथे पोहोचलेल्या महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढला असून, शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. निकेश वाघ असे मृताचे नाव असून, तो त्याची आई दीपिका, भावंडे, आजी-आजोबा आणि सावत्र वडील गणेश वाघ यांच्यासोबत राहत होता.
मृत मुलासह संपूर्ण कुटुंब जीवदानी मंदिराच्या पायऱ्यावर भीक मागून आपला उदरनिर्वाह करीत होते. या मुलाच्या मृत्यूनंतर विरार पूर्वेकडील मंदिराच्या पायथ्याशी त्यांच्या राहत्या घराशेजारी मृतदेह पुरला होता. सावत्र बाप गणेश हा मद्यधुंद अवस्थेत नेहमी पत्नी व घरातील सर्वांना बेदम मारहाण करायचा. वाघ याच्या मारहाणीनंतर मुलाचा मृत्यू झाल्यानंतर तीन फूट खोल खड्डा खणून मृतदेह ब्लँकेट आणि चटईमध्ये गुंडाळून पुरला होता.
एका मुलाचा मृतदेह दफन केला असून, दफन स्थळाजवळ मुलाची भावंडे रडत होती, तेव्हा ही घटना उघडकीस आली. विरार पोलिसांशी तत्काळ संपर्क साधला.
...तर मृतदेह
जेजेमध्ये पाठविणार
मृत अल्पवयीन मुलाला दफन करण्यात आले होते. आम्ही मृतदेह बाहेर काढला असून, विरारच्या रुग्णालयात शवागारात सुरक्षित ठेवले आहे. गरज पडल्यास आम्ही मृतदेह जेजे रुग्णालयात पाठवू, अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी ‘लोकमत’ला दिली.
मुलगा आजारी असल्याचा दावा
अपघाती मृत्यूची नोंद केली असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र, सावत्र वडिलांना भाटपाडा या डोंगर परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांना सुगावा लागल्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, मुलगा आजारी होता. त्यातच त्याचा मृत्यू झाला, असे मृताच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले.