धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 10:30 AM2024-09-23T10:30:11+5:302024-09-23T10:31:15+5:30
दिल्लीच्या ओल्ड राजेंद्र नगर भागात काही महिन्यांपूर्वी एका युवतीने सुसाईड केली होती, तीदेखील यूपीएससीची तयारी करत होती.
नवी दिल्ली - शहरातील मुखर्जी नगर भागात UPSC ची तयारी करणाऱ्या एका युवकाच्या मृत्यूनं खळबळ उडाली आहे. २० सप्टेंबरला जंगलात झाडाच्या फांदीवर लटकलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळला. हा युवक राजस्थानच्या दौसा भागात राहणारा असून त्याने यूपीएससीची प्रीलिम्स परीक्षाही क्लिअर केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, या मृत युवकाचं नाव दीपक आहे. तो ११ सप्टेंबरपासून बेपत्ता होता. दीपकने UPSC प्रीलिम्स परीक्षा क्लिअर केली होती. तो मेन परीक्षा देणार होता. या युवकाच्या मृतदेहाजवळ कुठलीही सुसाईड नोट आढळली नाही. मृतदेहाचे पोस्टमोर्टम मेडिकल बोर्डाकडून करण्यात आले आहे. दीपकने सुसाईड केली की त्याची कुणीतरी हत्या केली याबाबत अद्याप स्पष्टता नाही. ज्या युवकाने युपीएससी प्रीलिम्स क्लिअर केली होती त्याचा मृतदेह जंगलातील एका झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळला त्यामुळे पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत.
पोलीस सध्या या जंगलाच्या आसपास लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करत आहे. त्यात एका फुटेजमध्ये दीपक एकटाच जंगलाच्या दिशेने जाताना दिसतोय. मागील महिन्यातही दिल्लीच्या ओल्ड राजेंद्र नगर येथे यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. अंजली असं युवतीचं नाव होते, ती महाराष्ट्रातील होती. जी दिल्लीत भाड्याने खोली घेऊन यूपीएससीची तयारी करत होती.
२१ जुलैला अंजलीने सुसाई़ड केली आणि मृत्यूपूर्वी तिने सुसाईड नोट लिहून हे पाऊल उचलण्यामागचं कारणही सांगितले होते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कशाप्रकारे समस्यांचा सामना करावा लागतो, हे विद्यार्थी कुठल्या दबावाखाली असतात हे सुसाईड नोटमध्ये लिहिलं होते. विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या आर्थिक समस्या आणि त्यातून होणारी कोंडी या सुसाईडमागील प्रमुख कारण होते. पीजी आणि विद्यार्थ्यांकडून पैसे लुटले जातात. प्रत्येक विद्यार्थी दिल्लीत राहून कोचिंग घेण्यास सक्षम नसतो असं त्यातून दिसून आले. त्यामुळे आता पुन्हा एकदा यूपीएससीची तयारी करणाऱ्या युवकाच्या मृत्यूने अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.