अज्ञात महिलेची हत्या करून जाळला मृतदेह, पिंपळगाव लेंडीजवळील घटना
By संदीप वानखेडे | Published: May 30, 2024 06:02 PM2024-05-30T18:02:01+5:302024-05-30T18:02:18+5:30
पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न : सिंदखेडराजा, किनगाव राजा रस्त्यावरील पिंपळगाव लेंडीजवळील घटना
सिंदखेडराजा : अज्ञात महिलेची हत्या करून तिचा मृतदेह जाळल्याची घटना ३० मे राेजी सिंदखेडराजा शहरापासून १० किमी अंतरावरील पिंपळगाव लेंडी फाट्यावर उघडकीस आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन किनगाव राजा पोलिसांसह, वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळाच्या जवळच राहणारी एक महिला सकाळी ७ वाजता प्रातर्विधीसाठी गेली असता त्यांना ही घटना लक्षात आली. भेदरलेल्या महिलेने परिसरातील अन्य लोकांना याची माहिती दिली. पोलिसांना कळविण्यात आले़ त्यानंतर पोलिसांनी परिसर सील करून प्राथमिक तपास केला व मृतदेह ताब्यात घेतला. प्राथमिक तपास म्हणून येथे श्वानपथक, ठसेतज्ज्ञ यांना देखील पाचारण करण्यात आले होते.
अतिरिक्त पोलिस अधीक्षकांनी दिली माहिती
घटनेचे वृत्त कळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या संदर्भात माहिती देताना महामुनी यांनी समोरच राहणाऱ्या एका महिलेने किनगाव राजा पोलिसांना याविषयी माहिती दिली. स्थानिक पोलीस अधिकारी विनोद नरवडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली व पाहणी केली. घटनास्थळी दाखल होऊन घटनेची माहिती घेतली. साधारण २० ते २५ वयोगटातील ही महिला असून तिला आधी ठार मारण्यात आले असावे व मध्यरात्रीपासून पहाटेच्या दरम्यान तिचा मृतदेह सिंदखेडराजा, किनगाव राजा रस्त्यावरील एका पडक्या धाब्याच्या मागे आणून टाकल्यानंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मृत महिलेच्या अंगावर जखमा
मृत महिलेच्या मानेवर मारल्याच्या खुणा असून पोटावरदेखील जखम दिसून आली. दरम्यान, महिलेच्या चेहऱ्यावर जळालेला कापड टाकण्यात आला आहे. तिच्या अंगावर काळ्या रंगाचा जळालेला परकर, अर्धवट जळालेला गाऊन होता. तिच्या डाव्या पायाच्या पंजाची बोटे तुटलेली असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.