अवघ्या ६ दिवसांत आई-वडील अन् मुलाचा मृतदेह सापडला; पोलीस तपासात खळबळजनक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 06:06 PM2022-01-19T18:06:01+5:302022-01-19T18:10:05+5:30
मृतांमध्ये आईवडील आणि मुलगा यांचा समावेश होता. एका आठवड्यात तिघांचा मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी सापडल्याने पोलिसही हैराण आहे
लखनऊ – उत्तर प्रदेशच्या राजधानीत या वर्षीच्या सुरुवातीला एका हत्याकांडामुळे खळबळ माजली. ६ जानेवारीला याठिकाणी २६ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला. त्यानंतर २ दिवसांनी एक वृद्ध मृतावस्थेत सापडले. परत १३ जानेवारीला मॉल परिसरात एका वृद्ध महिलेचा मृतदेह सापडला. या सर्व हत्या गळा दाबून केल्याचं दिसून आलं होतं. आता पोलीस तपासात या तिघांमध्ये नातं असल्याचा खुलासा झाला आहे.
मृतांमध्ये आईवडील आणि मुलगा यांचा समावेश होता. एका आठवड्यात तिघांचा मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी सापडल्याने पोलिसही हैराण आहे. या प्रकरणात पोलिसांनी मृत दाम्पत्याच्या दुसऱ्या मुलाला ताब्यात घेतले आहे. आयजी लखनऊ लक्ष्मी सिंह म्हणाल्या की, सर्वात आधी युवकाचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. त्यानंतर निवृत्त कर्मचारी अफसर महमूद अली आणि त्यांची पत्नी यांचाही मृतदेह आढळला. पोलिसांनी या तिघांच्या हत्याकांडाचा तपास केला तेव्हा दुसरा मुलगा सरफराज याच्यावर संशय आला. सरफराजला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी सरफराज आणि त्याच्या सहकारी अनिल यादवला बेड्या ठोकल्या.
वडिलांवर होता तंत्र-मंत्र केल्याचा संशय
पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीने सांगितले की, त्याचे वडील त्याला पसंत करत नव्हते. वडील त्यांच्याकडील सर्व संपत्ती लहान मुलगा शावेदला देतील अशी भीती सरफराजला होती. वडील काही तंत्रमंत्र करत असल्याचा संशय सरफराजला होता. तसेच त्याला खाण्यासाठी देण्यात येणाऱ्या बिर्यानीत काहीतरी मिसळत असल्याचा आरोप सरफराजने केला.
झोपेची गोळी देऊन संपवलं
पोलिसांच्या माहितीनुसार, ३१ वर्षीय सरफराज एलएलबी करत असून जज बनण्याची त्याची तयारी सुरु होती. घरगुती कारणामुळे सरफराज आणि त्याच्या वडिलांना खटके उडायचे. त्यामुळे वडिलांचा काटा काढण्याचा डाव सरफराजने आखला. त्यासाठी त्याने अनिल यादव या सहआरोपीची मदत घेतली. ५ जानेवारीच्या रात्री ९० गोळ्या जेवणात मिसळून आई वडील आणि छोट्या भावाला खाण्यास दिली. त्यानंतर हे तिघं झोपण्यास गेले असता एकापाठोपाठ एक गळा दाबून हत्या केली.
हे हत्याकांड केल्यानंतर १३ जानेवारीला सरफराज जम्मूला गेला आणि त्याठिकाणाहून शावेज बनून नोएडा येथे राहणाऱ्या बहिणीला फोन केला. ते रामबन येथे लँड स्लाइडमध्ये अडकल्याची बतावणी केली. पुढच्या दिवशी लखनऊमध्ये येत सरफराजने आई वडील भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. परंतु जेव्हा या प्रकरणाचा तपास सुरु केला पोलिसांसमोर धक्कादायक खुलासे उघड झाले. हत्येनंतर सरफराजने वडीलांचा मृतदेह मलिहाबाद, आईचा मॉल परिसरात तर भावाचा मृतदेह इटौंजा येथे फेकला होता.