लाईव्ह स्ट्रीमिंग अॅपच्या बॉसने महिलेला मॉलमध्ये बोलावले, हॉटेलमध्ये नेऊन बलात्कार केला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 08:41 AM2023-01-12T08:41:36+5:302023-01-12T08:42:06+5:30
बॉस मॅनेजरने तिचे अश्लिल फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. कोरोना काळात घरच्यांना मदत म्हणून लाईव्ह स्ट्रीमिंग अॅपमध्ये घरून काम करत होती...
दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये एका महिलेने तिच्यावर तिच्या बॉसने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. खाद्यपदार्थांमध्ये नशेचा पदार्थ मिक्स करून त्याने हे कृत्य केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी एफआयआर नोंद केला असून ती एका अॅप कंपनीत काम करत होती. तिच्या बॉस मॅनेजरने तिचे अश्लिल फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.
महिलेने मॅनेजरच्या सहकाऱ्यांवर छळाचा आरोपही केला आहे. पोलीस ठाण्यात आयपीसी कलम ३७६ (बलात्कार), ३७७ (अनैसर्गिक लैंगिक संबंध), ५०६ (गुन्हेगारी धमकी), ३४ (सामान्य हेतू) आणि आयटी कायद्याच्या कलम ६७-अ आणि ७२ अंतर्गत पाच आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक वेद प्रकाश यांनी सांगितले की, आम्ही तपास करत आहोत. आरोपींना पकडण्यासाठी छापे मारत आहोत. तक्रारदार महिलेच्या दोन मुली आहेत. या ३० वर्षीय महिलेने म्हटले आहे की कोरोनातील लॉकडाऊनमध्ये घराला हातभार लागाला म्हणून तिने लाईव्ह स्ट्रिमिंग आणि सोशल इंट्रेक्शनसाठी मिको अॅपसाठी घरातून काम करू लागली होती.
या अॅपचा मॅनेजर कुणाल सिंह याने मला अॅडव्हान्स देण्याचा प्रस्ताव ठेवला. मी त्यास नकार दिला. यामुळे त्याने माझा तीन महिने पगार दिला नाही. १४ ऑगस्टला त्याने मला पगारावर बोलण्यासाठी एका मॉलमध्ये बोलविले. त्या मॉलबाहेर त्याने माझ्यासाठी काही पराठे आणि कोल्ड्रींक मागविले. कोल्ड्रींक पिल्यावर मला चक्कर येऊ लागली. यानंतर तो मला सेक्टर ३८ च्या एका हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि बलात्कार केला, असा आरोप या महिलेने केला आहे.
त्याने तिचे अश्लिल फोटो आणि व्हिडीओ तिला दाखविले आणि ते व्हायरल करण्याची धमकी दिली. मॅनेजरचे मित्र - कृष्णा शुक्ला उर्फ लुटेरा आणि त्याची पत्नी गौरी शर्मा या त्याच अॅपमध्ये काम करतात त्यांनी मॅनेजरच्या सांगण्यावरून माझी समजूत घालण्याचा प्रयत्न केला आणि धमकीही दिली. या मॅनेजरने न्यूड व्हिडीओ देखील बनविला आहे, असे या महिलेने पोलिसांना सांगितले आहे.