लॉजमध्ये प्रेयसीला नेऊन प्रियकराने गळा दाबून केली हत्या, प्रियकर फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 05:51 PM2022-02-28T17:51:58+5:302022-02-28T19:02:47+5:30
Murder Case : वसईतील एका लॉजमधील धक्कादायक घटना
नालासोपारा : वसईच्या पापडी येथील एका लॉजमध्ये २६ वर्षीय प्रेयसीची तिच्याच प्रियकराने गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही हत्या झाल्यानंतर आरोपी प्रियकर फरार झाला आहे. वसई पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून, गुन्ह्याचा तपास करत आहे.
वसईच्या पापडी परिसरात मुख्य रस्त्यावर स्टेटस लॉज आहे. या ठिकाणी एक जोडपे रविवारी दुपारच्या वेळी मुक्कामासाठी आले होते. रविवारी रात्री जेवणासाठी व सोमवारी सकाळी नाश्त्यासाठी लॉजच्या खोलीतून एकही कॉल नव्हता. सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास चेक आऊट करण्याची वेळ आली, तरी कोणताही प्रतिसाद हॉटेल व्यवस्थापकाला मिळाला नाही. शेवटी हॉटेलच्या कर्मचाऱ्याने त्या खोलीच्या दरवाजातील घंटी वाजवली तरीही आतून काहीच प्रतिसाद आला नाही. कर्मचाऱ्याने ही माहिती हॉटेल व्यवस्थापकांना सांगितली. त्यांना यात काही तरी गडबड असल्याचे लक्षात आल्यावर ही माहिती वसई पोलिसांना दिली.
पोलीस हॉटेलच्या ठिकाणी आल्यावर दार उघडण्यात आले. तर रूमच्या पलंगावर प्रेयसीचा मृतदेह आढळला. तिच्या डोक्यावर कोणत्यातरी जड वस्तूने प्रहार करून तिचा गळा दाबून हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले, तसेच आरोपी हा रविवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास निघून गेल्याचे हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. त्यामुळे ही हत्या रविवारी दुपारी झाल्याचे पोलिसांनी ‘लोकमत’ला सांगितले. हे जोडपे मागील सात वर्षांपासून हॉटेलमध्ये येत असल्याने ओळखीचे होते, तसेच या दोघांचे लग्न जमले असून, लवकरच ते विवाहबंधनात अडकले जाणार होते, अशी माहिती हॉटेलचे मालक प्रकाश हेगडे यांनी दिली. ही हत्या आरोपी प्रियकराने का व कोणत्या कारणावरून केली, याचा पोलीस तपास करीत आहेत.
प्रियकराने प्रेयसीची गळा दाबून हत्या केल्याची घटना घडली आहे. आरोपीने रविवारी दुपारी हत्या करून त्या ठिकाणाहून पळ काढला आहे. आरोपी तरुणाची ओळख पटली असून, लवकरच त्याला अटक केली जाईल. हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. - कल्याणराव कर्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई पोलीस ठाणे.