नवरी पळाली भुर्रर्र...नवरा पाहतच राहिला; दागिने आणि रोकड घेऊन पोबारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 10:05 AM2022-04-29T10:05:10+5:302022-04-29T10:05:17+5:30
मालाड पोलिसांत गुन्हा दाखल, नववधू आशाला लग्नाच्या आधी दागिने घातले होते. २९ मार्च रोजी मंदिरात त्यांचे लग्न पार पडले. दुसऱ्या दिवशी कदम यांनी व्यावसायिकाशी संपर्क साधून न्यायालयात लग्नाची नोंदणी करावी, अशी विनंती केली.
मुंबई : लग्नाच्या तीन दिवसांनंतर नववधू साडेचार लाखांच्या दागिन्यांसह पसार झाली. मालाडमध्ये हा प्रकार घडला असून, याप्रकरणी पोलिसांनी आशा गायकवाड, कमलेश कदम आणि तिची मावशी मनीषा कश्यप यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार कुटुंबाचे मालाड येथे हॉस्पिटल आहे. ते त्यांच्या २८ वर्षीय मुलासाठी वधूच्या शोधात होते. मुलाच्या अपंगत्वामुळे लग्न जुळविण्यासाठी त्यांनी एजंटकडे जाण्याचे ठरविले. पोलिसांना दिलेल्या जबाबात तक्रारदाराने सांगितले की, कमलेश कदम नावाच्या एजंटला ते भेटले, त्याने त्यांची आशा गायकवाड नावाच्या महिलेशी ओळख करून दिली. आशाने दावा केला की, ती अनाथ असून तिचे संगोपन तिची मावशी मनीषा कश्यप यांनी केले. कुटुंबीयांनी होकार दिल्यानंतर कदम यांनी तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची मागणी केली.
दरम्यान, नववधू आशाला लग्नाच्या आधी दागिने घातले होते. २९ मार्च रोजी मंदिरात त्यांचे लग्न पार पडले. दुसऱ्या दिवशी कदम यांनी व्यावसायिकाशी संपर्क साधून न्यायालयात लग्नाची नोंदणी करावी, अशी विनंती केली. तेव्हा सासरची मंडळी नोंदणी करायला न्यायालयात गेले असता, मनीषाने सह्या करण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केली. ते पैसेही तिला देण्यात आले. यानंतर नववधू आशा वराच्या घरी गेली आणि तीन दिवस तिथे राहिली. त्यानंतर १ एप्रिल रोजी तिने लग्नात दिलेले सर्व दागिने परिधान केले आणि बाजारात जाऊन येते, असे सांगून बाहेर पडली. उशिरापर्यंत ती न परतल्याने वराच्या वडिलांनी तिच्या फोनवर फोन केला असता तो बंद होता. त्यांनी कदम आणि कश्यप यांनाही फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोदेखील लागत नव्हता. त्यानंतर त्यांनी पत्नीच्या फोनवरून पुन्हा आशाच्या नंबरवर कॉल केला. तेव्हा तिने फोन उचलला आणि त्यांना सांगितले की, ती विवाहित आहे. तिला दोन मुले आहेत आणि तिला पैशांची नितांत गरज आहे. पैशांसाठी कदम आणि मनीषा यांच्या सांगण्यावरून तिने लग्न केल्याचीही कबुली दिली.
आम्ही दोन महिलांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांची कार्यपद्धती पाहता, असे दिसते की ते एखाद्या टोळीचा भाग आहेत. आतापर्यंत आम्हाला आढळलेली सर्व कागदपत्रे बनावट असल्याचा संशय आहे. - धनंजय लिगाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मालाड पोलीस ठाणे