माथेफिरू पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या, नाऊर येथील घटना, पतीला अटक
By शिवाजी पवार | Published: April 28, 2023 10:51 AM2023-04-28T10:51:23+5:302023-04-28T10:56:42+5:30
हत्येच्या घटनेने उडाली खळबळ
शिवाजी पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : तालुक्यातील नाऊर येथे घरगुती वादातून माथेफिरू पतीने पत्नीला साखळदंडाने बांधून डोक्यात टणक वस्तूने मारून हत्या केली. गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. माथेफिरू पतीला तालुका पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा अटक केली.
निर्मला शांताराम देसाई (वय ४२) असे मयत महिलेचे नाव आहे. तिचा पती शांताराम खंडेराव देसाई (वय ४५) याच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाऊर चौफुलीजवळ देसाई यांची वस्ती आहे. निर्मला देसाई व पती शांताराम खंडेराव देसाई हे दोघे तेथे राहत होते. त्यांना एक विवाहित मुलगा व मुलगी आहेत. पती-पत्नीमध्ये गुरुवारी वाद झाले. त्यानंतर पत्नीला साखळदंडाने बांधून तिला मारहाण करण्यात आली तसेच डोक्यात टणक वस्तूने घाव घातला. यात निर्मला या गंभीर जखमी झाल्या.
त्यानंतर दोरीच्या साह्याने गळा आवळून जीवे मारल्याचा प्राथमिक अंदाज साखर कामगार रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र जगधने यांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक दशरथ चौधरी हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी निर्मला देसाई यांचा मृतदेह येथील साखर कामगार रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी पती शांताराम विरुद्ध गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. शेजारच्या एका महिलेने पोलिसांना फोनवरून घटनेची माहिती दिली. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.