नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती यांच्या घरी चोरी; साडे सहा लाखाचा ऐवज लंपास
By नंदकिशोर नारे | Published: January 22, 2024 01:49 PM2024-01-22T13:49:39+5:302024-01-22T13:50:02+5:30
कपाटातील रोख ३ लाखांची रोकड आणि अडीच लाखाच्या सोन्याच्या दागिन्यांचा समावेश
नंदकिशोर नारे, वाशिम: शहरातील ड्रीमलँड सिटी परिसरात वास्तव्यास असलेले नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती गौतम सोनोने यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले रोख ३ लाख ८५ हजार व २.५० लाख रुपये मूल्य असलेले सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली.
ड्रीमलँड सिटी मध्ये वास्तव्यास असलेले सोनोने कुटुंब २० जानेवारीला महत्वाच्या कामानिमित्त अकोला येथे घराला कुलूप लावून गेले होते. अज्ञात चोरट्यानी घरावर पाळत ठेऊन रात्रीच्या सुमारास मुख्य दरवाजा व सुरक्षा ग्रिल असे दोन्ही कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरूम मध्ये असलेल्या कपाटातील लॉकर चे कुलूप तोडून त्यामधील रोख ३ लाख ८५ हजार व सोन्याचे दागिने ज्याची अंदाजे किंमत २ लाख ५० हजार असा एकूण साडे सहा लाख रुपयाचा ऐवज अज्ञात चोरट्यानी लंपास केला. सोनोने कटुंब अकोला येथून आपले कौटुंबिक कामकाज आटोपून परत आले असता सदर बाब उघडकीस आली . सोनोने यांनी ही बाब पोलिसांना दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला .