मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला कोर्टानं दिली दुहेरी जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 06:28 AM2023-02-24T06:28:20+5:302023-02-24T06:28:28+5:30
आरोपीला लैंगिक अपराधांपासून बालसंरक्षण अधिनियमातील कलम ४ (२) व कलम ६ अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
नागपूर - दोन अल्पवयीन मुलींवर वारंवार बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला गुरुवारी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. विशेष सत्र न्यायालयाचे न्या. ओ. पी. जयस्वाल यांनी हा निर्णय दिला. ही संतापजनक घटना मोमीनपुरा येथील आहे.
आरोपीला लैंगिक अपराधांपासून बालसंरक्षण अधिनियमातील कलम ४ (२) व कलम ६ अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय, त्याला अन्य काही कलमांतर्गत वेगवेगळ्या कालावधीच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या सर्व शिक्षा त्याला एकत्र भोगायच्या आहेत. आरोपी व्यवसायाने ऑटोचालक असून, त्याची पत्नी गर्भवती असताना १७ मे २०१९ रोजी मरण पावली. त्यावेळी त्याची मोठी मुलगी १४ वर्षे, तर लहान मुलगी १२ वर्षे वयाची होती. पत्नीच्या मृत्यूनंतर त्याने दोन्ही मुलींवर वाईट नजर टाकायला सुरुवात केली. तसेच जून २०१९ ते १३ नोव्हेंबर २०२० या कालावधीत दोन्ही मुलींवर वारंवार बलात्कार केला. त्यांना ठार मारण्याची धमकी दिली.
नोव्हेंबर २०२० मध्ये दोन्ही मुली मामाच्या घरी गेल्या होत्या. स्वत:च्या घरी जाण्याचा दिवस उजाडल्यानंतर लहान मुलीच्या अश्रूंचा बांध फुटला. मामाने कारण विचारल्यानंतर तिने बापाच्या कुकृत्याची माहिती दिली. त्यानंतर मामाने दोन्ही मुलींमध्ये धाडस भरून त्यांना तहसील पोलिस ठाण्यात नेले. मुलींनी बापाविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला २१ नोव्हेंबर २०२० रोजी अटक केली. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. रश्मी खापर्डे यांनी कामकाज पाहिले.
नातेवाइकांनाही शिक्षा
मोठा भाऊ, वहिनी व दुसऱ्या पत्नीला आरोपीच्या कुकृत्याची माहिती होती; परंतु त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली नाही. त्यामुळे तिघांनाही प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली.
पुनर्वसनाचा आदेश
दोन्ही पीडित मुलींच्या पुनर्वसन व शिक्षणाकरिता तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश न्यायालयाने जिल्हा विधिसेवा न्यायाधिकरणच्या सचिवांना दिले. तसेच मुलींना भरपाई अदा करण्याचा आदेशही दिला.