Shraddha Walker Murder Case: नार्को टेस्ट करण्यासाठी तयार आहेस का?; न्यायालयाच्या प्रश्नावर आफताबचं एका वाक्यत उत्तर!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 09:30 PM2022-11-18T21:30:41+5:302022-11-18T21:37:22+5:30
Shraddha Walker Murder Case: आरोपी दिशाभूल करत असल्याने पोलिसांनी नार्को टेस्टसाठी परवानगी मागितली होती.
नवी दिल्ली- श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याची पोलिस कोठडी गुरुवारी ५ दिवसांनी वाढवत दिल्लीच्या एका न्यायालयाने शहर पोलिसांना त्याच्या ‘नार्को टेस्ट’ची परवानगी दिली.
आरोपी दिशाभूल करत असल्याने पोलिसांनी नार्को टेस्टसाठी परवानगी मागितली होती. या टेस्टमुळे पोलिसांना या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यास मदत होईल. आफताबला जेव्हा न्यायालयात नार्को टेस्टबाबत विचारण्यात आले, तेव्हा त्याने 'I give my consent' म्हणजेच माझी संमती असल्याचं उत्तर दिलं.
'त्याच्या प्रभावाखाली माझ्या हातून हत्या झाली'; आफताबचा मोठा खुलासा, प्रकरण वेगळ्याच वळणावर!
आफताबच्या फ्लॅटवर आढळलेले रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ते मानवी रक्त असल्याचे निष्पन्न झाल्यास श्रद्धाच्या वडिलांची डीएनए चाचणी करण्यात येईल. पूनावाला याने कथितरित्या श्रद्धा वालकरचा गळा दाबून खून केला व तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून ते एक एक करून शहराच्या अनेक भागात फेकून दिले, असा आरोप आहे.
पोलिसांकडे आतापर्यंत असलेले पुरावे-
१. आफताबची कबुली २. आफताबने जेथून फ्रिज विकत घेतले, त्या दुकानमालकाचा जबाब आणि बिल ३. जंगलात सापडलेले अवयव आणि किचनमध्ये सापडलेले रक्त ४.आफताबने श्रद्धाच्या बँक खात्यातून ५४ हजार रुपये काढल्याचा तपशील.
वेब सीरिज पाहिली-
श्रद्धा वालकरच्या मृतदेहाची खांडोळी करायला आरोपी आफताब पूनावाला याला सुमारे १० तास लागले. काम संपवून त्याने बीअर आणली, मग नेटफ्लिक्सवर वेब सीरिज पाहिली आणि झोपी गेला.
मैत्रीण फ्लॅटवर-
श्रद्धाची हत्या केल्यानंतरही आफताबने एका मैत्रिणीला फ्लॅटवर आणले होते. श्रद्धा फ्लॅटवर नसतानाही तो पूर्वी असे करीत असे. यावरुन दोघांत भांडणे होत होती. पोलीस या मुलीचाही शोध घेत आहेत. श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबने त्याचा जुना फोन ओएलएक्सवर विकल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. पोलिस हा फोन परत मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.