क्रूरतेचा कळस! नराधमानं सर्व हद्दच पार केली; मुलीचं शरीर पाहून आईही हादरली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 09:12 PM2022-06-16T21:12:37+5:302022-06-16T21:18:31+5:30
Rape Case : मुलीला एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. बदरपूर पोलिसांनी बुधवारी रात्री मुलीवर बलात्कार करणाऱ्या राहुलला पलवलमध्ये अटक केली आहे.
दक्षिण-पूर्व दिल्लीतील बदरपूर भागात आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. यासोबतच त्याने मुलीच्या अंगावर अनेक ठिकाणी दाताने चावा घेतल्याचे क्रूर कृत्य देखील नराधमाने केले. मुलीच्या अंगावर चावल्यामुळे 20 हून अधिक जखमेच्या खुणा आहेत. मुलीला एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. बदरपूर पोलिसांनी बुधवारी रात्री मुलीवर बलात्कार करणाऱ्या राहुलला पलवलमध्ये अटक केली आहे. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
दक्षिण-पूर्व जिल्हा पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी तिच्या आईसोबत बदरपूर परिसरात राहते. वडील खूप पूर्वी दोघांना सोडून गेले होते. मुलीची आई एका कारखान्यात काम करून कुटुंब चालवते. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ही महिला ड्युटीवर गेली होती. संध्याकाळी ती परत आली तेव्हा मुलीला रक्तस्त्राव झाला होता आणि तिच्या अंगावर चाव्याच्या खुणा होत्या. मुलगी घाबरली होती. आईने मुलीला काय झाले विचारले असता मुलीने सांगितले की, इमारतीत राहणाऱ्या काकांनी तोंड दाबून जबरदस्तीने खोलीत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.
आईच्या अनैतिक संबंधास मुलीने केला विरोध, प्रियकराला बोलावून घडवून आणला गँगरेप
मुलीच्या शरीराचा असा एकही भाग नाही, जिथे आरोपीने चावा घेतला नसेल. एम्समध्ये दाखल करण्यात आलेल्या मुलीची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. मुलगी खूप घाबरली असून तिचे समुपदेशन करण्यात आले आहे. डॉक्टरांनी मुलीला त्यांच्या देखरेखीखाली ठेवले आहे.
पलवल येथून आरोपीला अटक करण्यात आली
दक्षिण-पूर्व जिल्ह्याच्या डीसीपी ईशा पांडे यांनी सांगितले की, मुलीवर बलात्कार झाल्याची माहिती 15 जूनला मिळाली होती. पीडितेला एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. पीडित मुलीच्या आईने सांगितले की, जगदीशपुरा, आग्रा येथे राहणारा राहुल हा दोन दिवसांपूर्वी इमारतीत राहायला आला होता. आरोपी राहुलने तिच्या मुलीवर बलात्कार केला आहे. बदरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. आरोपींना पकडण्यासाठी एसआय राजीव गौतम यांच्या देखरेखीखाली चार पथके तयार करण्यात आली होती. पोलिसांच्या पथकाने बुधवारी रात्री मोबाईलच्या आधारे राहुलला त्याच्या मावशीच्या घरातून बामिनीखेडा जिल्हा पलवल हरियाणा गावातून अटक केली. राहुलला ड्रग्जचे व्यसन आहे.
मुलीने आरडाओरडा केल्यावर तिलाही मारहाण करण्यात आली
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर मुलगी प्रचंड घाबरली आहे. एकुलत्या एक मुलीची अवस्था पाहून तिच्या आईची अवस्था बिकट आहे. आरोपीने चुकीचे कृत्य करताना तोंडात कापड कोंबल्याचे पीडित मुलीने आईला सांगितले. ती वेदनेने रडू लागली तेव्हा आरोपींनी तिलाही मारहाण केली.