धोकादायक इब्राहिम व आकाश यांना केले स्थानबद्ध; वाळू तस्करीसह आवश्यक वस्तूंचा काळाबाजार
By विलास.बारी | Published: August 18, 2023 06:00 PM2023-08-18T18:00:50+5:302023-08-18T18:07:34+5:30
भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथील इब्राहिम ऊर्फ टिपू ऊर्फ टिप्या सत्तार मन्यार (२९) याच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात वेगवेगळे सात गुन्हे दाखल आहेत.
जळगाव : पायरेटेड व्हिडीओ, वाळू तस्करी, अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार तसेच इतर वेगवेगळे गुन्हे दाखल असलेले भुसावळ तालुक्यातील वराडसीम व चोपडा येथील प्रत्येक एका जणाविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्यांना पुणे व नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.
भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथील इब्राहिम ऊर्फ टिपू ऊर्फ टिप्या सत्तार मन्यार (२९) याच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात वेगवेगळे सात गुन्हे दाखल आहेत. तसेच प्रतिबंधात्मक कारवाईदेखील करण्यात आली आहे. भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी यांनी २५ रोजी त्याच्याविरूद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव स्थानिक गुन्हे शाखेकडे सादर केला होता. तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. त्यानुसार १७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्थानबध्दतेचे आदेश दिले. भुसावळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची येरवडा मध्यवर्ती कारागृह (पुणे) रवानगी केली.
या सोबतच चोपडा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आकाश संतोष भोई (२२, चोपडा) याच्याविरुध्ददेखील सात गुन्हे दाखल आहेत. तसेच अदखलपात्र गुन्हे, प्रतिबंधात्मक कारवाईदेखील करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्धही चोपडा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांनी प्रस्ताव स्थानिक गुन्हे शाखेकडे दि. ११ रोजी पाठविला होता. त्या प्रकरणीही जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानबध्दतेचे आदेश दिले. त्यानुसार चोपडा पोलिसांनी १८ ऑगस्ट रोजी ताब्यात घेवून नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे रवानगी केली. जिल्ह्यात इतर अनेक सराईत गुन्हेगार हे एमपीडीए कारवाईच्या रडारवर असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी सांगितले.