भय इथले संपत नाही! मंदिरात गेलेल्या तरुणींचे सकाळी आंब्याच्या झाडावर सापडले मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 06:22 PM2024-08-27T18:22:56+5:302024-08-27T18:25:56+5:30
जन्माष्टमी निमित्ताने मंदिरात जात असल्याचे दोन्ही तरुणींनी कुटुंबीयांना सांगितले होते. रात्रभर त्या घरीच आल्या नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे मृतदेह सापडले.
Crime news Marathi: जन्माष्टमीनिमित्त मंदिरात जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या दोन तरुणींचे सकाळी मृतदेहच आढळून आले. या घटनेने उत्तर प्रदेशात खळबळ माजली आहे. दोन्ही आमराईमध्ये एका आंब्याच्या झाडाला दोन्ही तरुणींचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून, तपास सुरू केला आहे.
उत्तर प्रदेशातील फर्रुखाबादमधील कायमगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गावात घडली. भगौतीपूर येथे घडलेल्या घटनेमुळे सगळे गाव हादरले आहे. गावातील रहिवासी रामवीर जाटव यांची मुलगी बबली (वय १८) आणि महेंद्र जाटव यांची मुलगी शशि (वय १६) या दोन्ही तरुणींचे मृतदेह आढळून आले.
घरातून बाहेर पडल्यानंतर मृतदेहच सापडले, काय घडलं?
बबली आणि शशि जन्माष्टमी निमित्त मंदिरात जाण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. घरच्यांना मंदिरात चालल्याचे सांगून रात्री निघाल्या. पण परत आल्या नाही.
बराच वेळ गेल्यानंतर दोघींच्या कुटुंबीयांनी त्यांची चौकशी केली पण काही कळू शकले नाही. त्यानंतर मावशीच्या घरी थांबल्या असतील, असा विचार करून त्यांनी शोध थांबवला.
दरम्यान, मंगळवारी (27 ऑगस्ट) सकाळी आमराईमध्ये ग्रामस्थांना दोन मृतदेह आंब्याच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडले. गावात खळबळ उडाली. सगळे लोक घटनास्थळी जमा झाले.
काही लोकांनी जवळ जाऊन बघितल्यानंतर ते दोन्ही मृतदेह बबली आणि शशिचे असल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस गुन्हा घडलेल्या ठिकाणी पोहोचले.
उत्तरप्रदेश फर्रुखाबाद में 2 लड़कियों के शव आम के बाग में फांसी पर लटके मिले।
— Yogita Bhayana योगिता भयाना (@yogitabhayana) August 27, 2024
दोनों लड़कियां कल श्रीकृष्ण जन्माष्टमी पर मंदिर गई थीं,वापस घर नहीं लौटीं !! pic.twitter.com/aYzzrkAMJI
कशा अवस्थेत होते मृतदेह?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबली आणि शशिचा मृतदेह एकाच दुपट्ट्याने लटकलेल्या अवस्थेत होते. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी केली. दोघींचे मृतदेह पोलिसांनी पोस्टमार्टेमसाठी पाठवले असून, रिपोर्टनंतर मृत्यूचे कारण कळू शकेल, असे पोलिसांनी सांगितले.