मृतदेह कारमध्ये घेऊन गाठला ढाबा; दिल्लीतील निक्की हत्याप्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 12:06 PM2023-02-16T12:06:39+5:302023-02-16T12:07:38+5:30
घरच्यांनी इतरत्र लग्न ठरवल्यानंतर निक्कीशी घातला वाद
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची आठवण करून देणाऱ्या निक्की यादव हत्या प्रकरणात आता मोठे खुलासे होत आहेत. ९ फेब्रुवारीला संध्याकाळी निक्की आणि साहिल गेहलोत यांच्यात कारमध्ये लग्नावरून भांडण झाले होते. संतापलेल्या साहिलने तिची हत्या केली. मृतदेह कारमध्ये घेऊन त्याने ३५ किमी अंतरावरील ढाबा गाठला.
साहिलने निक्कीचा मृतदेह ढाब्याच्या फ्रीजमध्ये लपवून ठेवला होता. साहिलला ५ दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. साहिलने जानेवारी २०१८ मध्ये उत्तमनगर येथील करिअर पॉइंट कोचिंगमध्ये एसएससी परीक्षेची तयारी सुरू केली. यादरम्यान निकीने तेथील आकाश इन्स्टिट्यूटमध्ये वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी सुरू केली. दोघेही एकाच बसने ये-जा करत असत. दोघांची मैत्री झाली आणि नंतर ते प्रेमात पडले.
साहिलचे लग्न ठरल्याचे कळाले अन्...
साहिलचे लग्न १० फेब्रुवारीला घरच्यांनी इतरत्र ठरवले होते. याची माहिती निक्कीला समजताच दोघांमध्ये बाचाबाची झाली. संध्याकाळी काश्मिरी गेटजवळ पोहोचले असता दोघांत पुन्हा भांडण झाले आणि संतप्त साहिलने मोबाइलच्या केबलने गळा आवळून तिचा खून केला. यानंतर घरच्यांच्या सांगण्यावरून त्याने १० फेब्रुवारीला दुसऱ्या मुलीशी लग्न केले.