अंडरवर्ल्ड डॉनच्या छोट्या भावाचा मृत्यू; तुरुंगात खितपत पडलेला, पहिल्या हत्येनंतर मुंबईला पळालेला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 11:24 AM2023-06-13T11:24:18+5:302023-06-13T11:25:26+5:30
खान मुबारक हा आजारी असल्याने त्याला हरदोई जिल्हा तुरुंगाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.
उत्तर प्रदेशमध्ये गेल्या काही काळात अनेक गँगस्टर्स, माफियांचा खात्मा योगी सरकार करत आहे. काही दशकांपूर्वी जे मुंबईत झाले ते आता युपीत होऊ लागले आहे. आता अंडरवर्ल्ड डॉन जफर सुपारीचा लहान भाऊ खान मुबारकचा तुरुंगात शिक्षा भोगत असताना मृत्यू झाला आहे.
खान मुबारक हा आजारी असल्याने त्याला हरदोई जिल्हा तुरुंगाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. खानला दीर्घ काळापासून निमोनियासह अनेक गंभीर आजार झाले होते. आंबेडकरनगरच्या या माफियाला युपी एसटीएफने २०१७ ला अटक केली होती. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणीखोरी सारखे अनेक गंभीर गुन्हे नोंद होते. ही संख्या जवळपास तीन डझनावर जात आहे. त्याला २०२० मध्ये लखनऊ तुरुंगातून हरदोईला हलविण्यात आले होते.
जफर सुपारी युपीतील तरुणांना शूटर्स म्हणून सप्लाय करायचा. काला घोडा शुटआऊटमध्ये जफरचे नाव समोर आले होते. तर त्याचा भाऊ खान मुबारक याने इलाहाबादच्या विश्वविद्यालयाचा विद्यार्थी असताना पहिली हत्या केली होती. यानंतर तो जफरकडे मुंबईला पळून आला होता. जफर छोटा राजनसाठी काम करत होता. पहिल्या भेटीतच मुबारकदेखील छोटा राजनचा खास बनून गेला होता.