पंतप्रधानांची योजना डिझायनरने हडपली, ‘यूजीसीची अनुमती नाही तरी...’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 09:24 AM2022-04-28T09:24:23+5:302022-04-28T09:25:32+5:30
‘लोकमत’शी बोलताना अमरदीप सिंह म्हणाले की, विक्रमशिला विद्यापीठाची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली होती, तर ते एखादी खासगी व्यक्ती कसे स्थापन करू शकते यावर सिंह म्हणाले की, गेल्या सात वर्षांत तर ते बनवू शकले नाहीत म्हणून मी स्थापन करीत आहे.
शरद गुप्ता
नवी दिल्ली : आठव्या शतकातील पाल वंशाचा राजा धर्मपालने स्थापन केलेले विक्रमशिला विद्यापीठ गेल्या एक वर्षापासून सुरू आहे तेही कागदोपत्री आणि एका वेबसाइटवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विक्रमशिला विद्यापीठाच्या निर्मितीसाठी २०१५ मध्ये पॅकेजची घोषणा केली होती. हीच योजना एका ग्राफिक डिझायनरने हडपली असून त्याने विद्यापीठाची वेबसाइट बनवून त्याचे कामही सुरू केले आहे.
अणुऊर्जा आणि एयरोस्पेस इनोव्हेशनसारखे विषय शिकविण्याचा दावा विद्यापीठ करते. हजारो कोटींच्या निविदा जारी करून बिल्डर व बांधकाम कंपन्यांकडून गॅरंटी मनी म्हणून कोट्यवधी रुपये वसूल केले आहेत.
युनिव्हर्सिटीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमरदीप सिंह एका आयटी कंपनीत ग्राफिक डिजायनर म्हणून काम करायचे. त्यांनी गेल्या वर्षी इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी बनवून विक्रमशिला फाउंडेशन स्थापन केले. विक्रमशिला युनिव्हर्सिटी नावाने वेबसाइट बनवून बनावट कामे सुरू केली. याच महिन्यात कंपनीच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले चंदन मेहता म्हणाले की, “मी चार महिने काम केले. ते कोणते काम करतात आणि कोठून पैसे आणतात हे मला माहीत नव्हते.”