डॉक्टर कुटुंबाला ‘ही’ चूक पडली महागात! दरोडेखोर ‘असे’ घुसले घरात
By संजय पाटील | Published: July 12, 2023 10:27 PM2023-07-12T22:27:29+5:302023-07-12T22:29:04+5:30
सुरक्षारक्षक होता; पण झोपलेला; ‘सीसीटीव्ही’त पाहूनही वॉचमनला नाही उठवलं
लोकमत न्यूज नेटवर्क
कऱ्हाड : शहरातील शिंदे मळ्यात डॉक्टरच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा पडला. ज्या बंगल्यात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातल्या त्या बंगल्याची सुरक्षाव्यवस्था मजबूत आहे; पण कधीकधी एखादी त्रुटी किती महागात पडू शकते, हे या दरोड्याच्या घटनेत दिसून आले. बाहेरून सहजासहजी बंगल्यात घुसणे शक्य नाही; मात्र केवळ एका त्रुटीमुळे दरोडेखोर आत घुसू शकले आणि त्यानंतर ४३ लाखांची लूट करून ते पसारही झाले.
कऱ्हाडचा वाढीव भाग असलेल्या बारा डबरी परिसरात शिंदे मळा आहे. या मळ्यात डॉ. राजेश शिंदे यांचा ‘होलिस्टिंग हिलिंग सेंटर’ नावाचा दवाखाना आहे. तर या दवाखान्याच्या पाठीमागील बाजूस त्यांचा बंगला आहे. बंगल्यात डॉ. राजेश शिंदे हे पत्नी व मुलांसमवेत राहतात. मुळातच हा बंगला आणि बंगल्याचे आवार प्रशस्त आहे. बंगल्याभोवती चोहोबाजूंना मजबूत कपाउंड आहे; तसेच अगदी गेटपासून बंगल्याच्या आतपर्यंतचा सर्व परिसर ‘सीसीटीव्ही’च्या कक्षेत आहे. ‘सीसीटीव्ही’चे चित्रणही डॉ. राजेश व त्यांच्या पत्नी पूजा यांना मोबाइलवर पाहता येते. गेटमधून आत जाताच बंगल्याचा मुख्य दरवाजा आहे. या दरवाजाला तीन प्रकारच्या कड्या आहेत; तसेच दरवाजाही मजबूत आहे. त्यामुळे तो तोडून अथवा कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश करणे शक्य नाही. इतर कोणत्याही बाजूने बंगल्यात घुसता येत नाही; मात्र बंगल्याच्या एका बाजूला असलेल्या बेडरूममध्ये बाहेरील बाजूला लोखंडी जाळीचा दरवाजा आणि त्याच्या आतमध्ये काचेचा दरवाजा आहे.
या लोखंडी जाळीच्या दरवाजाला आतून असलेली कडी बाहेरून हात घालूनही काढता येते; तसेच त्याचे कुलूप तोडणेही शक्य आहे. तसेच बंगल्याच्या टेरेसवर बाहेरूनही जाता येते. टेरेसचा दरवाजा कमकुवत आहे आणि तो दरवाजा तोडूनच दरोडेखोर बंगल्यात घुसल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच लूटमार केल्यानंतर बेडरूमला असलेल्या काचेच्या दरवाजातून ते बाहेर पडल्याचा अंदाज आहे. पोलिसांना या दोन्ही ठिकाणी दरोडेखोरांच्या पावलांची ठसे आढळले आहेत.
सुरक्षारक्षकाला लागली डुलकी
ज्यावेळी दरोडा पडला त्यावेळी बंगल्याच्या आवारात सुरक्षारक्षक होता; मात्र तो झोपला असल्याचे ‘सीसीटीव्ही’मध्ये स्पष्टपणे दिसत आहे. दरोडेखोर बंगल्यात घुसून दरोडा टाकून बाहेर पडेपर्यंत सुरक्षारक्षकाला जाग आली नव्हती, हे दुर्दैव म्हणावे लागेल.
मोबाइलमध्ये पाहिलं, वॉचमन झोपलाय; पण...
डॉ. राजेश शिंदे यांच्या पत्नी पूजा यांना दरोडा पडण्यापूर्वी तासभर अगोदर जाग आली होती. त्यावेळी त्यांनी मोबाइलमधून सीसीटीव्ही तपासले असता, वॉचमन झोपल्याचे त्यांना दिसले. त्यावेळी त्यांनी वॉचमनला जागे करणे गरजेचे होते. मात्र, वॉचमन झोपल्याचे पाहिल्यानंतर पूजा याही मोबइल बंद करून झोपी गेल्या.
...असा पडला दरोडा
रात्री ९ वा. : शिंदे कुटुंबीय झोपले
मध्यरात्री २ वा. : पूजा शिंदे यांना जाग आली
पहाटे ३ वा. : दरोडेखोर बंगल्यात घुसले
पहाटे ३ वा. १५ मि. : डॉ. शिंदे यांच्यासह कुटुंबाला धमकाविले.
पहाटे ३ वा. ४८ मि. : लूटमार करून दरोडेखोर बंगल्याबाहेर पडले