धनाढ्याच्या मुलाला वाचविण्यासाठी चालकाने घेतला गुन्हा अंगावर!
By अनिल गवई | Published: July 16, 2024 11:38 PM2024-07-16T23:38:44+5:302024-07-16T23:39:05+5:30
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून चौकशी : मृताच्या रक्ताचे नमुने बदलल्याचा संशय
खामगाव : राज्यात हिट ॲन्ड रन प्रकरणं गाजत असतानाच, एका धनाड्याच्या मुलाचा बचाव करण्यासाठी चक्क चालक बदलण्यात आला. खामगाव तालुक्यातील माथनी येथील एका चालकाने हा गुन्हा अंगावर घेतला. युवकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या युवकाला वाचविण्यासाठी ही सारवासारव करण्यात आली. मात्र सत्य कधी लपत नाही, एक ना एक दिवस ते बाहेर येते, अशीच प्रचिती यानिमित्ताने समोर आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, खामगाव तालुक्यातील एका वैद्यकीय व्यावसायिकाच्या पुतण्याने एमएच-२७, डीई-७५४२ या भरधाव कारने एमएच-२८, बीके-८७७२ या क्रमांकाच्या दुचाकीस्वाराला उडविले. ही घटना २ जुलै रोजी दुपारी पाच वाजता दरम्यान खामगाव-शेगाव रोडवर घडली.
गंभीर जखमी दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. त्यानंतर शेगाव ग्रामीण पोलिसांत घटनास्थळावर नसलेल्या एका चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. इतकेच नव्हे तर धनाड्याच्या सांगण्यावरून मृताच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रकारही घडल्याची चर्चा आहे. त्यामुळे पुणे येथे गाजत असलेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणाचीच पुनरावृत्ती हे प्रकरण असल्याची जोरदार चर्चा आहे.
नातीच्या लग्नासाठी घेतला गुन्हा अंगावर
या प्रकरणाची कुणकुण लागताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी शेगाव ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतील प्रकरणाची उलट तपासणी केली. त्यावेळी बदललेल्या आरोपीने नातीच्या लग्नासाठी हा गुन्हा अंगावर घेतल्याची कबुली दिली. गावातील एका लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून त्याने प्रकार केल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.
रक्ताचे नमुने बदलल्याचा संशय
घटनेनंतर शेगाव ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये अनेक वेगवान घडामोडी झाल्या. धडक देणाऱ्या युवकानेच अपघातग्रस्त युवकाला रुग्णालयात हलविले. दरम्यान, मृताच्या नातेवाईकाच्या तक्रारीवरून शेगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तर मृताच्या रक्त नमुन्याशीही छेडछाड करण्यात आल्याचा सूत्रांचा दावा आहे.
मृताच्या नातेवाईकाने दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित नावाच्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. परिवारातील सदस्याचा मृत्यू झाल्याने भेदरलेल्या अवस्थेत दिलेल्या नावावरून गुन्हा दाखल केला आहे. मात्र, वस्तुस्थिती समोर आल्यानंतर गुन्ह्यातील खरा आरोपी शोधून काढण्यात आला. मृताच्या नातेवाईकाने दिलेल्या नावामुळे हा घोळ झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
- दिलीप वडगावकर, पोलिस निरीक्षक, शेगाव ग्रामीण