कुटुंबीय मुलीला घ्यायला गेले, चोरट्यांनी दीड लाखाचा ऐवज लांबविला
By विजय.सैतवाल | Published: June 16, 2024 09:55 PM2024-06-16T21:55:16+5:302024-06-16T21:55:32+5:30
रोख ५० हजारांसह सोन्या-चांदीचे दागिने गायब
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ध्यान साधना केंद्रात शिबिरासाठी गेलेल्या मुलीला घेण्यासाठी गेलेल्या कुटुंबीयाच्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी रोख ५० हजारांसह सोने-चांदीचे दागिने असा एकूण एक लाख ४१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना १४ जून ते १६ जून दरम्यान सुनंदिनी पार्कमध्ये घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रिंटींग प्रेसचा व्यवसाय असलेले दिनेश भगवान भालेराव (४४, रा. सुनंदिनी पार्क) यांची मुलगी इगतपुरी येथे ध्यान साधना केंद्रात शिबिरासाठी गेली होती. तिला घेण्यासाठी १४ जून रोजी दिनेश भालेराव हे कुटुंबीयांसह गेले होते. त्या वेळी चोरट्यांनी लोखंडी ग्रीलच्या दरवाजाचा कडीकोयंडा व आतील दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील रोख ५० हजार रुपयांसह सोने-चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले.
१६ रोजी पहाटे साडेचार वाजता भालेराव हे घरी परतले त्या वेळी त्यांना दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. आत जाऊन पाहिले तर सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे करीत आहेत.
घाईत २५ ग्रॅम सोने खाली पडले
चोरटा चोरी करून जात असताना त्याच्या हातून २५ ग्रॅम सोन्याचा दागिना खाली पडला. त्यामुळे तेवढे सोने चोरीपासून वाचले. चोरी करताना चोरट्याला कोणाचा तरी आवाज आला, त्या वेळी पळ काढताना त्याच्या हातून हे सोने पडले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे.