बापच खूनी! मुलाच्या शरीराचे ग्राइंडरने केले तुकडे, नंतर कचऱ्याच्या पॉलिथिनमधून फेकले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 05:00 PM2022-07-25T17:00:03+5:302022-07-25T17:00:56+5:30
Murder case : शरीराचे छोटे तुकडे काळ्या पॉलिथिनमध्ये टाकून अवयव वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले.
गुजरातमधील अहमदाबादमधील वासणा परिसरात शिर, हात आणि पाय नसलेल्या एका अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडला आहे. या घटनेच्या 5 दिवसांनंतर वासणापासून 3 किमी अंतरावरील एलिसब्रिज परिसरातून कापलेले पाय सापडले. या घटनेबाबत पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. हा मृतदेह हितेश नावाच्या २१ वर्षीय तरुणाचा असून त्याच्या वृद्ध वडिलांनीच त्याची हत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आरोपी पित्याने ग्राइंडरने मुलाच्या शरीराचे छोटे तुकडे केले. त्यानंतर शरीराचे छोटे तुकडे काळ्या पॉलिथिनमध्ये टाकून अवयव वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, 22 जुलै रोजी अहमदाबादमध्ये हात, पाय आणि शिर कापलेला मृतदेह सापडला होता. तरुणाची हत्या त्याच्या वडिलांनीच केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाला दारू आणि ड्रग्जचे व्यसन होते. सध्या पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. त्याची चौकशी सुरू आहे.
आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता
अहमदाबाद क्राइम ब्रँचने दिलेल्या माहितीनुसार, मुलाच्या हत्येनंतर आरोपी वडील सुरतला गेले होते. सुरतहून गोरखपूरला अवध एक्स्प्रेसने जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याला अटक करण्यात आली. गोरखपूरमध्ये दर्शन घेतल्यानंतर आरोपींना तेथून नेपाळला पळून जायचे होते.
मुलाला दारूचे व्यसन होते
आरोपीने पोलिसांना सांगितले की, गेल्या 5-6 वर्षांपासून त्याचा मुलगा दारू आणि ड्रग्जच्या आहारी गेला होता, त्या दिवशीही तो दारू पिऊन पैशाची मागणी करत होता. पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने वडिलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर वडिलांनी घरात ठेवलेल्या दगडाने त्याच्या डोक्यात जोरदार प्रहार केल्याने त्याचा मृत्यू झाला.
ग्राइंडर मशीनने केले तुकडे
मुलाच्या मृत्यूनंतर आरोपी वडील अहमदाबादच्या कालुपूर मार्केटमध्ये गेले, तेथून ग्राइंडर मशीन आणली. यानंतर त्यांनी मुलाच्या शरीराचे छोटे तुकडे केले. त्यानंतर ते तुकडे कचऱ्याच्या काळ्या पॉलिथिनमध्ये भरून वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यात आले.
आतापर्यंत मृतदेह आणि पाय पोलिसांनी जप्त केले आहेत. चौकशीत अमली पदार्थाच्या सवयीमुळे वडिलांनीच मुलाची हत्या केल्याचे समोर आले आहे.