थरारक! सासूसह ७ वर्षीय मुलावर बापानं केले वार, त्यानंतर स्वत:लाच जाळून घेतलं
By राजकुमार जोंधळे | Published: August 24, 2022 12:05 AM2022-08-24T00:05:22+5:302022-08-24T00:11:21+5:30
मुलगा, सासूवर कत्तीने सपासप वार करुन जावयाची लातुरात आत्महत्या
राजकुमार जोंधळे
लातूर - बायको नांदायला येत नाही या कारणावरुन उदगीर येथील एका जावयाने कत्तीने निर्दयीपणे आपल्या पोटच्या सात वर्षीय मुलावर आणि ५० वर्षीय सासूवर सपासप वार करून हत्या करण्याचा खळबळजनक प्रयत्न मंगळवारी रात्री केला. या हल्ल्यात सासूचा जागीच मृत्यू झाला, मुलगा गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, जावयाने स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली आहे. ही घटना लातुरातील वीर हणमंतवाडी परिसरात घडली. या घटनेने लातुरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी सांगितले, उदगीर येथील रजनीकांत वेदपाठक (वय ३५ रा. उदगीर) याच्यासोबत लातुरातील वीर हणमंतवाडी येथील चंद्रसेना संजयकुमार वेदपाठक (वय ५०) यांच्या मुलीसोबत आठ वर्षापूर्वी रितिरिवाजाप्रमाणे लग्न झाले होते. लग्नानंतर कांही दिवस त्यांचा संसार सुखाने सुरु होता. दरम्यान, त्यांना कार्तिक हा मुलगा झाला. त्यानंतर त्यांच्यात बेबनाव निर्माण झाला. यातूनच त्यांच्यामध्ये सतत काहीना काही कारणावरुन भांडण, तंटा होत असे. या वादावादीला कंटाळलेली रजनीकांतची पत्नी लातुरातील वीर हणमंतवाडी येथील आपल्या आईच्या घरी गेल्या काही वर्षपासून राहत होती. अधूनमधून जावई हा बायकोला नांदायला पाठवा, असे म्हणून सासू आणि पत्नीसोबत वाद घालत होता. अखेर आज काटाच काढायचा, असे ठरवून सासरवाडीत मंगळवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास आला. काही समजायच्या आतच मुलगा कार्तिक याच्या मानेवर त्याने कत्तीने वार केले. सासू मुलाला वाचविण्यासाठी पुढे आली असता तिच्यावरही सपासप वार केले. सासू जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि तिचा जागेवरच मृत्यू झाला. तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रीशैल्य कोल्हे करत आहेत.
कार्तिकला खाजगी रुग्णालयात दाखल...
जखमी कार्तिकला शेजारच्या मावस सासूने तातडीने उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्याची प्रकृर्ती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सासरवाडीतच स्वतःला जाळून घेतले...
घटनेनंतर जावयाने स्वतःला पेटवून घेत जाळून घेतले असून, त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी त्यास शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले.
पोलीस अधीक्षकाची घटनास्थळी भेट...
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे, पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांनी भेट देवून पाहणी केली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.