गाडगेनगरमध्ये घडला वर्षातील पहिला चेनस्नॅचिंगचा प्रकार, अमरावतीमधील घटना
By प्रदीप भाकरे | Updated: January 29, 2023 14:43 IST2023-01-29T14:43:09+5:302023-01-29T14:43:50+5:30
महिलेने आरडाओरड केला पण तो पसार झाला

गाडगेनगरमध्ये घडला वर्षातील पहिला चेनस्नॅचिंगचा प्रकार, अमरावतीमधील घटना
अमरावती: वर्षातील पहिली चेनस्नॅचिंगची घटना गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. २७ जानेवारी रोजी रात्री ९ च्या सुमारास घडलेल्या त्या घटनेप्रकरणी २८ जानेवारी रोजी पहाटे २.३७ च्या दरम्यान एका महिलेच्या तक्रारीवरून वाटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारीनुसार, एक महिला २८ जानेवारी रोजी रात्री गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ठिकाणाहून पायी जात होती. त्यावेळी एक अज्ञात तरूण त्या महिलेच्या पाठीमागून चालत आला. महिलेने मागे वळून बघताच त्याने तिच्या गळ्यातील मंगळसूत्रावर हात टाकला. सुमारे २४ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र तोडून तो अंधारात त्वरेने पसार झाला. महिलेने आरडाओरड केली खरी. मात्र, तो दिसून आला नाही. याबाबत गाडगेनगर पोलिसांना माहिती देण्यात आली.
एसीपी पुनम पाटील व ठाणेदार आसाराम चोरमले यांनी तत्काळ घटनास्थळ गाठत महिलेकडून त्या अज्ञात व्यक्तीचे वर्णन जाणून घेतले. तो अज्ञात मंगळसूत्र चोर २४ ते २६ वर्षे वयोगटातील तथा सडपातळ बांध्याचा असल्याच्या वर्णनावरून पोलिसांनी त्याचा शोध घेतला. आजुबाजुच्या सीसीटिव्हीचे फुटेज देखील तपासले जात आहे. याप्रकरणी २८ जानेवारी रोजी पहाटे गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
गेल्या वर्षी घडल्या चेनस्नॅचिंगच्या १२ घटना
सन २०२२ मध्ये चेनस्नॅचिंगच्या एकुण १२ घटना घडल्या. तथा ११ एफआयआर नोंदविले गेले. यात सुमारे ७ ते ८ लाख रुपये किमतीचे सोने हिसकावून पळ काढण्यात आला. पोलीस सुत्रानुसार, पैकी सात घटना उघड करण्यात शहर पोलिसांना यश आले. राजापेठ व गाडगेनगर पोलिसांनी चेनस्नॅचर्सच्या मुसक्या आवळल्या होत्या.