भावी जोडीदार निघाला दोन मुलांचा बाप अन् ठग; आयकर आयुक्त असल्याची बतावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 07:34 AM2023-02-21T07:34:31+5:302023-02-21T08:46:41+5:30

उत्तर प्रदेशमधून इंजिनीअरला बेड्या

The future spouse turned out to be a father of two child and a thug; He introduced himself as Commissioner of Income Tax | भावी जोडीदार निघाला दोन मुलांचा बाप अन् ठग; आयकर आयुक्त असल्याची बतावणी

भावी जोडीदार निघाला दोन मुलांचा बाप अन् ठग; आयकर आयुक्त असल्याची बतावणी

Next

मुंबई : विवाह संकेतस्थळावरून आयकर विभागाचा आयुक्त असल्याचे भासवून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. सुखी संसाराचे स्वप्न रंगवत असतानाच, सामाजिक संस्थेत मदत, गुंतवणूक करण्याच्या नावाखाली तरुणीच्या कागदपत्रांवर कर्ज काढून तिला कर्जबाजारी केले. चौकशीत तो दोन मुलांचा बाप असून बनावट नावाने तरुणीच्या संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गावदेवी पोलिसांच्या कारवाईतून ही बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी उत्तरप्रदेशच्या मॅकेनिकल इंजिनीअर राजेश कुमार उपाध्याय (४५) याला अटक करण्यात आली आहे.  

ग्रॅन्टरोड परिसरात राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीशी एप्रिल २०२१ मध्ये विवाह संकेतस्थळावरून राजेशने सिद्धांत धवन या नावाने संपर्क साधला. पुढे, आयकर आयुक्त तसेच रॉ मध्ये नोकरीस असल्याचे भासवून लग्नाचे आमिष दाखवले. याच दरम्यान, एप्रिल २०२१ ते जानेवारी २०२२ दरम्यान आरोपीने स्वतःची एनजीओ असल्याचे सांगून मदतीच्या नावाखाली तरुणीची कागदपत्रे मिळवली. पुढे त्याच कागदपत्रांवर ५ लाखांचे कर्ज घेतले. ते पैसे तरुणीच्या खात्यात जमा होताच ते त्याच्या खात्यात वळते करून घेतले.  वेगवेगळी कारणे पुढे करत त्याने ११ लाख १३ हजार रुपये उकळले.

आरोपी चालवत होता स्वतःची अकॅडमी 
राजेश उपाध्याय याने मॅकेनिक इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा केला आहे. तसेच, लखनौमध्ये तो स्वतःची यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी अकॅडमी चालवत होता. मात्र, त्याला प्रतिसाद कमी मिळाल्याने त्याने ती बंद केली. त्यानंतर, झटपट पैसे कमविण्यासाठी अशाप्रकारे ठगीचा धंदा सुरू केला आहे. 

फोटो व्हायरल करण्याची धमकी
पुढे, आणखीन पैशांची मागणी होताच तरुणीने त्याच्याशी संवाद कमी केला. त्यानंतर, एका अर्धनग्न महिलेचा फोटो पाठवून तिचे फोटोदेखील तसेच व्हायरल करण्याची धमकी दिली. अखेर, यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. 

उत्तर प्रदेश कनेक्शन झाले उघड
वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ताराम गिरप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलिस निरीक्षक विजय दंडवते, पीएसआय किरण जाधव, हेमंत उगले, पोलिस अंमलदार कांबळे, जाधव, चव्हाण आणि कड यांनी तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने तपास सुरु केला. यामागे उत्तर प्रदेश कनेक्शन उघडकीस येताच पथकाने त्याला सुलतानपूर येथून अटक केली आहे. 

अनेकांची फसवणूक 
उपाध्यायच्या मोबाईलमध्ये अनेक मुलीचे मोबाईल क्रमांक मिळाले असून, त्याने अशाच प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचा संशय पथकाला आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

Web Title: The future spouse turned out to be a father of two child and a thug; He introduced himself as Commissioner of Income Tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.