शासकीय यंत्रणेचे बनावट दस्तावेज तयार करणारी टोळी गजाआड!
By सचिन राऊत | Published: March 6, 2023 09:55 PM2023-03-06T21:55:51+5:302023-03-06T21:56:19+5:30
पाच आरोपींचा समावेश असून दोन जण बांग्लादेश, काही जण पश्चिम बंगाल व अकोल्यातील हरीहर पेठेतील रहीवासी असल्याची माहिती आहे.
अकोला : शासकीय यंत्रणेचे बनावट दस्तावेज तयार करणाऱ्या टोळीला जुने शहर पोलिसांनी रविवारी गजाआड केले. यामध्ये पाच आरोपींचा समावेश असून दोन जण बांग्लादेश, काही जण पश्चिम बंगाल व अकोल्यातील हरीहर पेठेतील रहीवासी असल्याची माहिती आहे.
किडनी तस्करी रॅकेट प्रकरणतील आरोपी तसेच जुने शहरातील रहिवासी देवेंद्र शिरसाट हा राजेंद्र पंढरी वाकपांजर याच्या मदतीने शासकीय यंत्रणेचे बनावट दस्तावेज तयार करून त्याचा गैरवापर करीत असल्याची माहिती जुने शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांना मिळाली.
या माहितीवरुन त्यांनी हरीहर पेठेतून देवेंद्र शिरसाट याला ताब्यात घेतले. तर त्याच्या माहितीवरुन आपातापा रोडवरील दमानी नेत्र रुग्णालय परिसरातून राजेंद्र वाकपांजर याला अटक केली. त्याच्या घराची झडती घेतली असता एक लॅपटॉप, तीन प्रिंटर, एक स्कॅनर, एक लॅमिनेशन मशिन आणि एक पीसीएस मशीन व विविध शासकीय कार्यालयाचे शिक्के, शाळेचे दाखले व कोरे रेशनकार्ड हे साहित्य जप्त करण्यात आले.
यावरून देवेंद्र शिरसाट व त्याचा साथीदार राजेंद्र वाकपांजर या दोघांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध जुने शहर पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष दुधगांवकर, पोलिस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश सुर्यवंशी करीत आहेत.