जेवण बनवावे लागते म्हणून घरातून पळाली मुलगी, यूपीतून थेट गाठलं ठाणं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 08:46 PM2022-05-25T20:46:04+5:302022-05-25T20:46:42+5:30
Girl ran away from Home : चाईल्ड प्रोटेक्शन युनिटची कामगिरी, आई-वडिलांनी त्रास दिल्याचा आरोप
ठाणे: आई-वडील वरचेवर जेवण बनविण्यास सांगतात या रागातून उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून घर सोडून ठाण्यात आलेल्या एका १७ वर्षीय तरुणीला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात ठाणेपोलिसांना यश आल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी बुधवारी दिली. ठाण्यातील मासुंदा तलाव भागात ती फिरताना आढळल्यानंतर चाईल्ड प्रोटेक्शन युनिटच्या पथकाने चौकशी करून व्हिडिओ कॉलद्वारे तिची ओळख पटवली. त्यानंतर तिला सुखरूप दिव्यातील तिच्या बहिणीच्या ताब्यात दिल्याने बहिणीने समाधान व्यक्त केले.
ठाणे चाईल्ड प्रोटेक्शन युनिटचे जमादार विजय बडगुजर, हवालदार सुनील साळवी, हनुमंत तळेकर, पोलीस नाईक तेजश्री शिरसाठ आणि सुवर्णा यादम व जमादार वेंगुर्लेकर आदींचे पथक २१ मे २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास भिक्षेकरू व बालकामगारांचा शोध घेण्यासाठी ठाणे शहरात गस्त घालत होते. त्याचवेळी मासुंदा तलाव, चिंतामणी चौक परिसरात त्यांना एक तरुणी एका झाडाखाली बसलेली आढळली. महिला पोलिसांच्या मदतीने तिची या पथकाने विचारपूस केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर तिने उत्तर प्रदेशातील शीतलगंज ( ता. मडीयाहू, जिल्हा जौनपूर,) येथून आल्याचे सांगितले.
ही माहिती मिळाल्यानंतर पथकाने जौनपूर येथील मडीवाहू पोलीस ठाण्यात संपर्क केला. तेव्हा ही मुलगी १९ मे २०२२ पासून बेपत्ता असल्याची नोंद या पोलीस ठाण्यात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या तरुणीच्या भावाचा मोबाइल क्रमांक मिळवून पथकाने त्यांच्याशी संपर्क साधला. भावाने आपल्या बहिणीस ओळखले. त्यांची एक बहीण दिवा येथील मुंब्रा कॉलनीमध्ये राहत असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी दिवा येथे राहणाऱ्या या बहिणीशी संपर्क साधून ठाण्यात आलेल्या तरुणीबद्दल माहिती दिली. व्हिडिओ कॉलद्वारे त्यांनी आपसात संवाद केला. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून २१ मे राेजी या मुलीला तिच्या बहिणीच्या ताब्यात देण्यात आले. आई-वडील वारंवार जेवण बनविण्यास सांगतात. या प्रकाराला कंटाळून आपण घर सोडून आल्याची कबुली या मुलीने पोलिसांना चौकशीमध्ये दिल्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप खाडे यांनी सांगितले.