बारावीचा पेपर द्यायला गेलेली तरुणी अजूनही बेपत्ता; कुटुंब चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2022 03:49 PM2022-06-11T15:49:51+5:302022-06-11T15:50:03+5:30
नालासोपारा यशवंतनगर येथे राहणारी पूजा चौधरी ही ५ एप्रिलला बारावीचा शेवटचा पेपर देण्यासाठी सोपाऱ्यातील कॉलेजमध्ये गेली होती.
नालासोपारा : बारावीचा शेवटचा पेपर द्यायला गेलेली नालासोपाऱ्यातील तरुणी गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असून, तिच्याबाबत माहिती देण्याचे आवाहन तिच्या आईने केले आहे.
नालासोपारा यशवंतनगर येथे राहणारी पूजा चौधरी ही ५ एप्रिलला बारावीचा शेवटचा पेपर देण्यासाठी सोपाऱ्यातील कॉलेजमध्ये गेली होती. मात्र, शेवटचा पेपर न देताच ती बेपत्ता झाली. ती घरी न परतल्यामुळे दोन दिवस नातेवाईक आणि ओळखीच्या घरी शोध घेतल्यानंतर तिच्या आईने नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीला दोन महिने उलटले तरी तिचा पत्ता लागला नसून, तिच्याकडे मोबाइल नसल्यामुळे शोध घेण्यात पोलिसांना अडचण येत आहे. मात्र, बेपत्ता झालेल्या दिवशी ती नायगांव पूर्वेकडील वाकीपाडा परिसरातून चालत जात असल्याचे तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे ही तरुणी नायगांव पूर्व परिसरात असण्याची शक्यता व्यक्त करून तिचा शोध घेण्यात सहकार्य करण्याचे आवाहन तिच्या पालकांनी केले आहे. तिच्याबद्दल काही माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.