प्रेयसीनेच केले मुख्याध्यापकाचे अपहरण, मागितली 30 लाखांची खंडणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2022 11:29 AM2022-09-04T11:29:52+5:302022-09-04T11:33:22+5:30
प्रदीप हरिराम मोतीरामानी (४६, क्रिष्णाती चौक, जरीपटका) असे अपहरण झालेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे.
नागपूर : प्रेम प्रकरणातून प्रेयसीनेच आपला घटस्फोटीत पती आणि त्याच्या मित्रांच्या साह्याने ३० लाखांच्या खंडणीसाठी प्रियकराचे अपहरण केल्याची घटना जरीपटका पोलीस ठाण्यांतर्गत घडली. पैसे न दिल्यास मृतदेहच पाठविण्याची धमकी आरोपींनी दिल्यामुळे पोलिसांत प्रचंड खळबळ उडाली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासांतच या अपहरण नाट्यावर पडदा टाकून तीन आरोपींना अटक केली असून एक जण फरार आहे.
प्रदीप हरिराम मोतीरामानी (४६, क्रिष्णाती चौक, जरीपटका) असे अपहरण झालेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. तर रिना फ्रान्सिस (मंगळवार कॉम्प्लेक्स), नोएल फ्रान्सिस (४४, महाराणा अपार्टमेंट, मानकापूर), सूरज फलके (२०) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील विक्की जैस हा आरोपी फरार आहे.
प्रदीप मोतीरामानी हे जरीपटक्याच्या महात्मा गांधी शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. याच शाळेत रिना फ्रान्सिस ही शिक्षिका म्हणून कार्यरत होती. दरम्यान, रिना आणि प्रदीप यांचे सुत जुळले. त्यानंतर रिनाने तेथून नोकरी सोडून हिंगण्याच्या एका शाळेत नोकरी सुरू केली. रिना आणि तिचा पती नोएल यांना एक मुलगी आहे. परंतु आपसात पटत नसल्यामुळे त्यांनी २००९ मध्ये घटस्फोट घेतला. दुसऱ्या शाळेत शिकविणे सुरू केले तरीही रिना आणि प्रदीपचे प्रेमसंबंध कायम होते. अशातच आर्थिक तंगीतून रिना आणि तिच्या घटस्फोट झालेल्या पतीने प्रदीपच्या अपहरणाचा बेत आखून शुक्रवारी रात्री १०.३० वाजता त्याचे अपहरण केले. परंतु पोलिसांना माहिती मिळाल्याचे पाहून आरोपींनी शनिवारी दुपारी ३ वाजता प्रदीपला सोडून दिले. प्रदीपचे अपहरण झाल्याची तक्रार त्यांची पत्नी ज्योती प्रदीप मोतीरामानी (४६) यांनी जरीपटका ठाण्यात दिली.
अपहरण करून नेले मानकापूरमधील फ्लॅटवर
रात्री १०.३० वाजता प्रदीपचे अपहरण करण्यात आले. आरोपींनी प्रदीपला विक्की जैस याच्या व्हेर्ना कारमध्ये बसवून मानकापूरच्या महाराणा १ अपार्टमेंटमध्ये पहिल्या माळ्यावर राहत असलेल्या नोएल फ्रान्सिसच्या फ्लॅटवर नेले. रात्रभर प्रदीपला आरोपींनी तेथेच ठेवले. दरम्यान, सकाळी त्याच्याच मोबाईलवरून ३० लाखांची खंडणी मागितली. परंतु पोलिसांना माहीत झाल्यामुळे घाबरून दुपारी सोडून दिले.