नशीब बलवत्तर! तब्बल १८ तासांनी ढिगाऱ्याखालून ‘त्याला’ जिवंत बाहेर काढलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 12:32 PM2022-02-11T12:32:53+5:302022-02-11T13:08:34+5:30
बिल्डरनं इमारत बांधताना अनेक त्रुटी केल्या होत्या. ज्याची तक्रार अनेकदा केली परंतु कुणीही दखल घेतली नाही
गुरुग्राम – शुक्रवारी संध्याकाळी दिल्लीच्या गुरुग्राममध्ये इमारतीचा काही भाग कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत इंडियन रेल्वे इंजिनिअरींग सर्व्हिसचे अधिकारी अरुण कुमार श्रीवास्तव यांचे नशीब बलवत्तर म्हणून १८ तासांच्या अथक प्रयत्नानं ढिगाऱ्याखालून त्यांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले. श्रीवास्तव यांचे पाय ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यानंतर त्यांना सर्व मेडिकल सुविधा देण्यात आल्या आणि रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलला घेऊन जाण्यात आले.
आता शोध पथक या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर अडकलेल्या महिलेला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. या दुर्घटनेची चौकशी अतिरिक्त जिल्हाधिकारी विश्राम कुमार मीणा यांच्याकडे सोपवली. गुरुग्रामच्या सेक्टर १०९ मध्ये चिंतल पैराडाइसो हाय राइज सोसायटीत गुरुवारी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास एक भीषण दुर्घटना घडली. या सोसायटीच्या डी ब्लॉकमध्ये ६ व्या मजल्यावर फ्लॅट रिनोवेशनचं काम सुरु आहे. त्याचवेळी एका रुमचा प्लोअर खाली कोसळला.
त्यानंतर सहाव्या मजल्यापासून खाली तळमजल्यापर्यंत सर्वच घरातील स्लॅप जमिनदोस्त झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ६ मजल्यापासून तळमजल्यापर्यंत काही फ्लॅट बंद होते. त्यात कुणीही वास्तव्यास नव्हते. परंतु इतर फ्लॅटमध्ये दुर्घटनेवेळी काही लोकं ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता होती. या अपघातात जवळपास १० लोकं जखमी झाले. एनडीआरएफची ३ टीम घटनास्थळी पोहचली आणि त्यांना तात्काळ मदतकार्यास सुरुवात केली.
सोसायटीत राहणाऱ्या काही लोकांनी आरोप केला आहे की, बिल्डरनं इमारत बांधताना अनेक त्रुटी केल्या होत्या. ज्याची तक्रार अनेकदा केली परंतु कुणीही दखल घेतली नाही. या घटनेनंतर माध्यमांनाही दुर्घटनास्थळी जाण्यापासून रोखलं होतं. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टरने गुरुग्रामच्या दुर्घटनेचे प्रशासकीय पातळीवर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री स्वत: वैयक्तिक रित्या या घटनेवर लक्ष ठेऊन आहेत. तर घटनास्थळी पोहचलेल्या बचाव कार्यातील अधिकाऱ्यांनी या प्रकरणात बिल्डरला चौकशीसाठी बोलावलं आहे. ही दुर्घटना नेमकी कशी घडली? याबाबत तपास सुरु असून दोषींवर योग्य ती कारवाई होईल असं सांगण्यात आले आहे.