छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळला, गेमच्या नादापायी मुलाने गमवला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 06:33 PM2022-06-09T18:33:24+5:302022-06-09T19:57:56+5:30
Suicide for Game : मालाडमधील हृदयद्रावक घटना आली उघडकीस
मुंबई: आईने मोबाइलवर गेम खेळण्यास विरोध केल्याने ओम भरत कथोरिया (१५) या मुलाने रेल्वे रुळावर आत्महत्या केल्याची धक्कादायक आणि तितकाच हृदयद्रावक प्रकार मालाड परिसरात गुरुवारी उघडकीस आला. त्याने लिहिलेली सुसाईड नोट घरच्याना मिळाली तेव्हा त्यांनी त्याचा शोध सुरू केला आणि त्याचा छिन्नविछिन्न मृतदेह कांदिवली मालाड रेल्वे ट्रॅकवर सापडला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
मालाड पूर्वच्या सीओडी कंपाउंडजवळ कथोरिया कुटुंब राहते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा ओम हा बुधवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास मोबाईलवर गेम खेळत होता. तेव्हा त्याच्या आईने हातातून मोबाईल काढून घेत दिवसभर गेम खेळणार तर अभ्यास कधी करणार ? असे म्हणत गेम खेळण्यास विरोध केला. त्यामुळे ओम आईवर रागवला आणि घराबाहेर निघुन गेला. काही वेळाने त्याची आई घरी आली आणि तिला एक पत्र मिळाले जे ओम याने लिहिले होते. त्यात 'मै जा रहा हु, अब कभी नही आऊगा', असे त्याने लिहिले होते. त्याच्या आईने हे वाचताच घरच्या लोकांसह पोलीस ठाणे गाठले. दिंडोशी पोलिसांनी देखील ओमचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान मालाड कांदिवली परिसरात लहान मुलाचा रेल्वे रुळांवर मृतदेह सापडला अशी माहिती दिंडोशी पोलिसांना मिळाली.
Mumbai | A 16-year-old boy allegedly died by suicide after his mother denied him from playing games on a mobile phone. He left a suicide note. His body was recovered from the railway track between Malad & Kandivali station: Dindoshi Police Station
— ANI (@ANI) June 9, 2022
त्यानुसार त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तो ओम असल्याची खात्री पटल्यावर याबाबत कथोरिया कुटुंबियांना कळविण्यात आले. त्यामुळे त्यांना जबर धक्का बसला. 'आम्ही याप्रकरणी सीसीटीव्ही पडताळले, मात्र त्यात काही रेकॉर्ड झालेले नाही. त्यानुसार आम्ही मोटरमनकडे चौकशी केली तेव्हा मुलाने रेल्वे रूळ ओलांडल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानुसार अपघाती मृत्यूची नोंद याप्रकरणी करण्यात आली आहे', अशी माहिती बोरीवली रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली. याप्रकरणी पोलीस अधीक तपास करत आहेत.