घरमालक मुलाच्या घरी गेले, चोरट्यानं पळवला घरातून १७ लाखांचा ऐवज!
By विलास जळकोटकर | Published: October 30, 2023 06:39 PM2023-10-30T18:39:16+5:302023-10-30T18:39:31+5:30
विजापूर रोडवरील मंत्री चंडक पार्क येथील हुसेनबाशा चाँदसाब शेख (वय- ६३) यांच्या घरात ही चोरी झाली.
सोलापूर : घरमालक मुलाच्या घरी गेलेले.. बायको अन् सूनही माहेरी गेलेली. जाताना दरवाजा कडेकोट कुलूपानी बंद केला असताना चोरटा मागचा दरवाजा फोडून शिरला आणि कपाटातून तब्बल १२ लाखांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा १७ लाख ८९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाला. रविवारच्या रात्री ही घटना उघडकीला आली आणि एकच गोंधळ उडाला. विजापूर रोडवरील मंत्री चंडक पार्क येथील हुसेनबाशा चाँदसाब शेख (वय- ६३) यांच्या घरात ही चोरी झाली.
या प्रकरणी फिर्यादी हुसेनबाशा यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद नोंदवली. यात त्यांनी म्हटले आहे की, रविवारी दुपारपासून घरामध्ये कोणीच नव्हते. हुसेनसाब आपल्या मुलाकडे नई जिंदगी येथे गेले होते. पत्नी ही तिच्या माहेरी आणि सुनही तिच्या माहेरी गेली होती. घरी कोणीच नसल्याने जाताना सुनेने मुख्य दरवाजाला कुलूप लावलेले होते. चोरट्याने रात्रीची संधी साधून मागच्या बाजूला किचनचा दरवाजा फोडून आत प्रवेश केला.
बेडरुममधील लाकडी कपाटाचे कुलूपही तोडले. आतमध्ये भारतीय चलनाच्या विविध दरांची १२ लाख रुपयांची रोकड सापडली. त्यानंतर त्यानंतर त्याला दागिन्यांचं घबाड सापडलं. असा एकूण १७ लाख ८९ हजार ५०० रुपयांचा ऐवज घेऊन चोरट्यानं धूम ठोकली. रात्री फिर्यादी हुसेनसाब घरी आल्यानंतर दरवाजा उघडा आणि अस्ताव्यस्त पसरलेले सामान पाहून त्यांना चोरी झाल्याची खात्री झाली. पहाटेच विजापूर नाका पोलीस ठाणे गाठून तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झाला.
काय काय गेले चोरीला?
चोरट्याने कपाटातील १२ लाखांची रोकड, ९० हजारांचा सोन्याचा अरबी पट्टा (३ तोळे), ३० हजारांचा राणी हार (२ तोळे), ९० हजारांचे नेकलेस (३ तोळे), ३० हजारांचे कानातील टॉप्स, २४ हजारांच्या दोन अंगठ्या (८ ग्रॅम), ४५ हजारांच्या ५ लेडिज अंगठ्या (१५ ग्रॅम), १.५ लाखांचे २ मंगळसूत्र ( ५ तोळे), ३० हजारांची सोन्याची चेन (१ तोळा), ३० हजाराचे मंगयसूत्र (१ तोळा), ३० हजारांच्या २ कनातील रिंग (१० ग्रॅम), ७ हजारांचे चांदीचे पैंजन (२२ तोळे), ३,५०० रुपयांचे चांदीचे पैंजन (१० तोळे) असा एकूण १७ लाख ८९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला.