घर फोडले, चोरटे शोधायचे कोणी? नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 02:02 PM2023-03-23T14:02:05+5:302023-03-23T14:02:27+5:30
मुंबईत गेल्या वर्षभरात ६४ हजार ६५६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
मुंबई : गेल्या दोन महिन्यांत मुंबईत सव्वादोनशे घरफोडीच्या तर ९४६ चोरीच्या घटना घडल्या आहेत. यापैकी अनुक्रमे ११५ आणि ३१७ गुन्ह्यांची उकल करत आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.
मुंबईत गेल्या वर्षभरात ६४ हजार ६५६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये दरोडा, जबरी चोरी, सोनसाखळी चोरी, घरफोडी, चोरी, वाहन चोरीच्या गुन्ह्यांत एकूण १२२ कोटी ३१ लाख २४ हजार ४४७ रुपयांची मालमत्ता चोरीला गेली. यापैकी ५३ कोटी १६ लाख ७४ हजार ५९३ कोटींची मालमत्ता हस्तगत करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. याच तुलनेत २०१९ मध्ये ३४ टक्के, २०२० मध्ये ३३ टक्के तर २०२१ मध्ये याचे प्रमाण वाढून ४३ टक्क्यांवर गेले.
यावर्षीच्या पहिल्या दोन महिन्यांत एकूण ६,१७५ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी ३,४४६ गुन्ह्यांची उकल झाली. यामध्ये घरफोडीच्या २२५ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. रात्रीच्या वेळी सर्वाधिक १८७ घरफोड्यांच्या घटनांचा यामध्ये समावेश आहे. गेल्यावर्षी याच दोन महिन्यांत घरफोडीच्या २४२, चोरीच्या ६४२ घटनांची नोंद झाली होती.
चोरट्याचा रात्रीस खेळ चाले
दोन महिन्यांत दिवसा ३८ तर रात्रीच्या सुमारास १८७ घरफोडीच्या घटनांची नोंद पोलिस दफ्तरी झाली आहे. रात्रीचा फायदा घेत चोरट्यांकडून घरफोडीच्या घटना वाढत आहेत.
पाच दरोडे
गेल्या दोन महिन्यांत दरोड्यासंबंधित ५ गुन्हे नोंद झाले आहेत. यापैकी ४ गुन्हे उघडकीस आले आहेत.