घर बंद करून गेले परगावी, इकडे चोरट्यांनी घर फोडले; कुंभारीत साडेतीन लाखांची चोरी
By Appasaheb.patil | Published: January 29, 2023 03:31 PM2023-01-29T15:31:52+5:302023-01-29T15:32:41+5:30
ही घटना क्रिस्टल सोसायटी नंबर २, कुंभारी (ता. द. सोलापूर) येथे घडली. याबाबतची माहिती रविवारी सकाळी पोलिसांनी माध्यमांना दिली.
सोलापूर : घर बंद करून गावी गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कडीकोंयडा तोडून घरातील साडेतीन लाखांचा ऐवज लंपास केला. यात रोख रक्कम व सोन्यांच्या दागिन्याचा समावेश आहे. ही घटना क्रिस्टल सोसायटी नंबर २, कुंभारी (ता. द. सोलापूर) येथे घडली. याबाबतची माहिती रविवारी सकाळी पोलिसांनी माध्यमांना दिली.
याबाबत रविकिरण मल्लिकार्जुन कोप्पल (वय ३२, रा. कुंभारी, ता. द. सोलापूर) यांनी वळसंग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार कोप्पल परिवार हे घर बंद करून गावी गेले होते. या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला.
घरातील कपाटात ठेवलेले रोख रक्कम २ लाख रुपये, १ लाख २० हजारांचे सोन्याचे गंठण व १२ हजाराचे चार ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे कर्णफुले असा एकूण ३ लाख ३२ हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. या घटनेची नोंद वळसंग पोलिस ठाण्यात झाली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शेख हे करीत आहेत.
क्रिस्टल सोसायटी चोरी प्रकरणात वळसंग पोलिस कसून तपास करण्यास सुरुवात केली आहे. रविवारी पोलिस उपनिरीक्षक शेख यांनी पंचनामा करून तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत. चोरट्यांच्या शोधासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज व परिसरातील लोकांची मदत घेण्यात येणार असल्याचे शेख यांनी सांगितले.