पत्नीचा खून करून पती एक्सप्रेस ट्रेनच्या शौचालयात लपला; मुंबईतील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 12:43 PM2022-05-29T12:43:34+5:302022-05-29T12:45:02+5:30
दिंडोशी पोलिसांची २४ तासांत कारवाई
मुंबई : चारित्र्याच्या संशयातून आणि पत्नी मानसिक छळ करते म्हणून कंटाळून पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केली. पोलिसांना चकमा देण्यासाठी तो एक्सप्रेस ट्रेनच्या शौचालयामध्ये लपून बसला. मात्र, त्याच्या मागावर असलेल्या दिंडोशी पोलिसांनी शिताफीने तपास करत अवघ्या चोवीस तासांत त्याच्या मुसक्या आवळल्या.
गोरेगावच्या संतोष नगर परिसरात रोझी खातून नामक महिलेची गळा आवळून हत्या करत तिचा पती अन्सार अली हिफाजत अली उर्फ समीर हा पसार झाला होता. त्याचा सात वर्षांपूर्वी खातूनशी प्रेम विवाह झाला. मात्र, या दोघांनाही एकमेकांच्या चारित्र्यावर संशय होता. त्यातून त्यांच्यात वाद सुरू होते. संतोष नगरमध्ये त्यांनी २५ मे रोजी एक पोटमाळा भाडेतत्वावर घेतला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अन्सारने त्याची मेव्हणी ज्युली हिला फोन करत रोझीला ठार मारल्याचे सांगितले.
याबाबत ज्युली हिने त्यांचे शेजारी प्रमोद मौर्या या किराणा दुकान चालकाला सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत खुनाचा गुन्हा दाखल झाल्यावर परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन खरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डॉ. चंद्रकांत घार्गे, पोलीस उपनिरीक्षक राजू बनसोडे तसेच योगेश कान्हेरकर व पथकाने तपास सुरू केला.
...लपाछुपी आणि अन्सार सापडला !
जवळपास २५ ते ३० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी केल्यावर अन्सार हा छपरा गोदान एक्सप्रेसने प्रवास करणार ही माहिती मिळाली. त्यानुसार कान्हेरकर व पथक नाशिकला लोकलने निघत त्यांनी प्रत्येक स्टेशनवर आरोपीला ताब्यात घेण्याबाबत अलर्ट दिला.
डॉ. घार्गे यांच्या पथकाने विमानाने उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे पोहोचून अन्सारसाठी सापळा रचला. प्रयागराज याठिकाणी लोकलचे सर्व प्रवासी आणि जनरल डब्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीवेळी आरोपी सापडला नाही. गाडी सुटणार इतक्यात डॉ. घार्गे यांच्या पथकाने समयसुचकता दाखवत शौचालय तपासण्यास सुरवात केली आणि अन्सार त्यांना सापडला.